पुनर्गठन नाही : खरिपाला सुरुवात, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडीगजानन मोहोड ल्ल अमरावतीखरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून अद्याप बी-बियाणे, खतांची खरेदी व्हायची आहे. मात्र, नव्याने पीककर्ज देण्यात बँकांनी हात आखडता घेतला आहे. १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील ३२ राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांनी एकूण उद्दिष्टांच्या ३१ टक्केच कर्जवाटप केले आहे. बँकांच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शासनाच्या मूळ उद्देशाचीच वाट लागली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकूण उद्दिष्टांच्या ५६ टक्के कर्जाचे वाटप १३ जूनपर्यंत केले आहे. त्या तुलनेत ग्रामीण बँक ३९ टक्के व राष्ट्रीयीकृत बँकांनी १९ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे. खरिपाकरिता १६९५ कोटी ४४ लाख इतका पीककर्ज वाटपाचा लक्ष्यांक आहे. त्या तुलनेत ५२६ कोटी २५ लाख ४२ हजारांचे कर्जवाटप केले आहे. हे कर्जवाटप एकूण उद्दिष्टांच्या केवळ ३१ टक्के आहे. जिल्हा सहकारी बँकेने ३७ हजार ५८४ शेतकऱ्यांना ३१४ कोटी ३२ लाख ४२ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे. हे खरिपाच्या कर्जवाटप उद्दिष्टांच्या ५६ टक्के आहे. २०८ कोटी ३१ लाख रुपयांचे कर्जवाटप १३ जूनपर्यंत करण्यात आले आहे. हे एकूण लक्षांकाच्या केवळ १९ टक्के आहे. ग्रामीण बँकांना ९ कोटी १९ लाख रुपयांचे खरीप पीककर्जाचे लक्ष्य असताना त्यांनी ४९३ शेतकऱ्यांना ३ कोटी ६२ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हे एकूण उद्दिष्टांच्या ३१ टक्के आहे. सन २०१४-१५ मध्ये खरीप हंगामाकरिता १९२२ कोटी ५० लाख रुपयांचे लक्षांक असताना १ लाख २२ हजार १५५ शेतकऱ्यांना १२२१ कोटी ७० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते.मागील कर्जाचे पुनर्गठन करुन खरिपासाठीच शेतकऱ्यांना नव्याने कर्जवाटप करण्याचे शासनाचे धोरण आहे. ज्या बँका शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाहीत, त्या बँकांच्या व्यवस्थापकावर कारवाई करण्यात येईल. - प्रवीण पोटे,पालकमंत्री.३० जूनपर्यंत १०० टक्के कर्ज वाटप करा- पालकमंत्री अमरावती : ३० जूनपर्यंत खरीप हंगाम-२०१५ साठी कर्जवाटपाचे उद्दिष्ट सर्व बँकानी साध्य करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पीककर्ज वाटपाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ए. राजा, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनंत खोरगडे आणि सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वर्षीच्या प्राप्त उद्दिष्टांपैकी आतापर्यंत ३१ टक्के कर्जवाटप झाले आहे. १०० टक्के कर्जवाटपासाठी सर्व बँकांनी ३० जूनपर्यंत आपले उद्दिष्ट ठेवावे. कर्जवाटपाचा दैनिक अहवाल द्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यानी दिल्या. कर्जवाटपासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागू नये तसेच सौजन्याची वागणूक मिळावी, असेही पालकमंत्र्यानी बँक प्रतिनिधींना सांगितले. शेतकऱ्यांसाठी तत्पर सेवा द्यावी.
३१ टक्केच पीककर्ज वाटप
By admin | Published: June 16, 2015 12:21 AM