अमरावती: पश्चिम विदर्भात आठवडाभरात काही मंडळांमध्ये पहिल्यांदा ढगफुटीसदृश पाऊस झाला. तब्बल ३७ तालुक्यांसह १९० महसूल मंडळांमध्ये हाहाकार उडाला होता. या आपत्तीमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. १९ गावांमधील ५५२ नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे. याशिवाय ९४८६ नागरिक विस्थापित झाल्याने त्यांना तात्पुरत्या निवाऱ्यामध्ये आसरा घ्यावा लागल्याचा विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्राथमिक अहवाल आहे.
विभागामध्ये २१ व २२ जुलै रोजी यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात पावसाने कहर केला होता. नदी-नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी गावात, शेतांत शिरले. त्यामुळे सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात १०, अकोला जिल्ह्यातील ५ व बुलडाणा जिल्ह्यातील ४ तालुके बाधित झाले. या गावांतील तब्बल ५५२ नागरिकांना एसडीआरएफ व डीडीआरएफच्या बचाव पथकाने रेस्क्यू करून सुरक्षित बाहेर काढले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात २९०, बुलडाणा जिल्ह्यात २३२ व अकोला जिल्ह्यातील ३२ जणांचा समावेश आहे. ६१७९४७ हेक्टर शेती बाधितअमरावती जिल्ह्यात ४४८७४ हेक्टर, अकोला १४२७८२ हेक्टर, यवतमाळ २.१८ लाख हेक्टर, वाशिम ४७६४३ व बुलडाणा जिल्ह्यात १६४६७७ हेक्टर बाधित झालेले आहे. यामध्ये २२४०३ हेक्टर शेती पुरामुळे खरडून गेलेली आहे. याशिवाय पाच जिल्ह्यांतील ७२ रस्ते व नदी-नाल्यांवरील ११८ पुलांचे मोठे नुकसान झालेले आहे.