पान २ बॉटम
समृद्ध गाव मिनी स्पर्धा : आज होणार ऑनलाईन गौरव
चिखलदरा : पाणी फाऊंडेशनच्यावतीने मेळघाटात मोठ्या प्रमाणात कामे केली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केलेल्या कामाचे मूल्यमापन आणि उत्कृष्ट कामे या बाबींवर चिखलदरा तालुक्यातील सहभागी ४६ गावांपैकी तब्बल ३१ गावांनी समृद्ध गाव मिनी स्पर्धेत बाजी मारली. सोमवारी या सर्व गावांचा ऑनलाईन पद्धतीने सत्कार होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविणार आहेत. मेळघाटातील पाड्यातून गावकरी व जिल्हा प्रशासनातील अधिकारी यात सहभागी होतील.
पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेत १२० गुणांची मिनी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये जल बचतीच्या साधनांचा वापर, विहीर व बोअरवेल सर्वेक्षण, विहीर पाणीपातळी मोजमाप, पीक लागवड अहवाल, स्वच्छ पेयजल, बचत गटांचे सभासदत्व, अस्तित्वात असलेल्या रचनांचे सर्वेक्षण, पर्जन्यमापक बसविणे व पावसाच्या नोंदी ठेवणे, वृक्ष आणि जंगलाची वाढ, आणि संरक्षित कुरणक्षेत्र तयार करणे या कामांचा समावेश होता. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन शासनाच्या मदतीने हा टप्पा पूर्ण केला. यामुळे तालुक्यातील ३१ गावे ही सत्कारासाठी पात्र ठरले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात हा सत्कार होणार होता. परंतु, कोरोनामुळे हा सत्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव व अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक २२ मार्च रोजी जागतिक जलदिनाच्या अनुषंगाने ऑनलाईन होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक वैभव नायसे व शिवहरी टेके यांनी केले आहे.
---------------
मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, आमिर खानचे पत्र
चिखलदरा तालुक्यातील निवडल्या गेलेल्या ३१ गावांतील ग्रामस्थांचा गौरव सोमवारी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, तहसीलदार माया माने, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका कृषी अधिकारी व्ही.एस. पठाडे तसेच तालुकास्तरावरील प्रशासकीय अधिकारी आणि पात्र गावांतील आदिवासी ग्रामस्थ या सोहळ्यात ऑनलाईन उपस्थिती दर्शविणार आहेत. त्याकरिता मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा तसेच आमिर खानकडून ऑनलाईन पत्र आले आहे.
कोट
पाणी फाउंडेशनच्यावतीने मेळघाटात केलेल्या कार्याची पावती म्हणून चिखलदरा तालुक्याच्या ३१ गावांचा गौरव ऑनलाईन पद्धतीने सोमवारी होत आहे. हे संपूर्ण जिल्हा व तालुका प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आदिवासी आणि आदिवासी आणि पाणी फाउंडेशन टीमचे यश आहे.
- वैभव नायसे, तालुका समन्वयक, पाणी फाउंडेशन, चिखलदरा