अमरावती : राज्याच्या मध्यवर्ती, जिल्हा, विशेष व महिला कारागृहात बंदिस्त ३१४५ कैद्यांनी ई-भेटीचा लाभ असून, व्हिडीओ कॉलिंग सुविधेद्वारे थेट नातेवाइकांशी संवाद साधला आहे. गत १८ दिवसात ऑनलाइन नोंदणीतून ई-प्रीझमद्वारे कैद्यांची नातेवाइकांसोबत ई-भेट शक्य झाली आहे.
महाराष्ट्र कारागृह व सुधारसेवा विभागाने राज्यात कारागृहांमध्ये बंदिस्त असलेल्या भारतीय तसेच विदेशी बंद्यांना कुटुंबीय तसेच वकिलांशी संवाद साधण्यासाठी ई-मुलाखत सुविधा ई-प्रीझम (आयसीजेएस) प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सर्व कारागृह प्रमुखांना दिले हाेते. ४ जुलै २०२३ पासून ही सुविधा सर्व कारागृहांनी सुरू केली आहे. परिणामी बंद्यांच्या नातेवाइकांना याबाबत माहिती पडल्याने व्हिडीओ कॉलिंगद्वारे बंदिजन आणि नातेवाईक यांची भेट अधिक सुलभ झाली आहे. त्यामुळे बंदी व नातेवाइकांमध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे.
केंद्रीय गृहविभागाच्या अधिनस्त असलेल्या एनआयसी या संस्थेने विकसित केलेल्या ई-प्रीझम प्रणालीद्वारे बंदी व नातेवाईक मुलाखत काही दिवस अगोदरसुद्धा नोंदणी करता येते. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा कारागृह येथील मुलाखत कक्षात प्रत्यक्ष मुलाखत घेता येते.यापूर्वी मुलाखत नाव नोंदणीसाठी नातेवाइकांना खूप दूर वरून प्रवास करत येऊन कारागृहाबाहेर तासनतास प्रतीक्षा करावी लागायची. त्यामुळे बंद्यांच्या नातेवाइकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. ई-भेट सुविधा उपलब्धमुळे जास्तीत जास्त बंद्यांच्या नातेवाइकांचा ई-भेट सुविधा वापरण्याकडे कल वाढला आहे.- डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह), पुणे