अमरावती : स्थानिक जाफरजिन प्लाॅटमधील एका गोडाऊनमधून तब्बल ३१७५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. शहर पोलिसांचे क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट व महापालिकेच्या स्वच्छता विभागाने गुरूवारी ही संयुक्त कार्यवाही केली. संतोष मंगलानी (रा. रामपुरी कॅम्प) याच्याकडे तिसऱ्यांदा प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्याने त्याला महापालिकेकडून २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर, त्याच्याविरूध्द फौजदारी तक्रार देखील दाखल करण्यात येणार आहे.
शहर पोलिसांचे सीआययू १० ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत असताना एकाने जाफरजिन प्लाॅटमधील एका गोडाऊनमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. ती माहिती महापालिकेच्या स्वच्छता विभागासह राजापेठ झोनला देण्यात आली. पोलीस व महापालिकेच्या स्वास्थ निरिक्षकांनी त्या गोडाऊनची तपासणी केली असता, आरोपी संतोष मंगलानी याच्या ताब्यातून एकुण १५.८७ लाख रुपये किमतीच्या ३ टन १७५ किलो वजनाचे प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्या प्रतिबंधित पिशव्या १२७ पोत्यांमध्ये साठविल्या होत्या. तो संपुर्ण जप्त माल स्वच्छता विभागाकडे सुपुर्द करण्यात आला.
तिसऱ्यांदा सापडला मंगलानी विशेष म्हणजे यापुर्वी दोनदा मंगलानी याच्याकडून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. तो आता तिसऱ्यांदा सापडल्यामुळे महापालिकेकडून २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास फौजदारी देखील करता येते. त्यामुळे महापालिकेकडून शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात येईल. पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, एसीपी प्रशांत राजे यांच्या मार्गदर्शनात सिआययूमधील सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरिक्षक गजानन राजमल्लू यांच्यासह महापालिकेच्या स्वच्छता विभाग प्रमुख डॉ. सीमा नैताम, राजापेठ झोनचे सहायक आयुक्त भुषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनात स्वास्थ निरिक्षक प्रशांत गावनेर यांनी केली.