अमरावती: जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाचे एकूण ८ आगार असून १४ बसस्थानक आहेत. त्यात काम करणारे चालक, वाहकांची १,६५० संख्या आहे. यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या मिळून २,५०० आहे. विभागातील बसेसची एकूण संख्या ३७५ आहे. सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे विभागातील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दररोज साधारणपणे ३० ते ३२ लाख रुपयांचे उत्पन्नाचे नुकसान होत असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गत फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनपासून अचानक गतवर्षीपेक्षा अधिक वेगाने कोरोना संसर्गाची वाढ होत गेल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीला सामाजिक अंतर राखणे, चेहऱ्यावर मास्क बांधणे, गर्दी टाळणे या सारख्या उपाययोजना करण्याच्या सूचना शासनस्तरावरून देण्यात आल्या. परंतु नागरिक येथील कोणतीही गोष्ट फारशी गांभीर्याने घेत नाही. असा अनुभव अनेक शहरांमध्ये गावात आल्यामुळे साहजिकच कोरोनाची वाढ झपाट्याने होत गेली. त्यामुळे शासनाला काही कठोर पावले उचलणे भाग पडले. सुरुवातीला दोन दिवसाचा विकेंड लॉकडाऊन आणि त्यानंतर १४ एप्रिलच्या रात्रीपासून ३० एप्रिलपर्यंत राज्य सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच जीवनावश्यक वस्तू वगळून अन्य सर्व दुकाने व्यवसाय बंद करण्यात आले. यामध्ये कार्यालय नागरिकांसाठी बंद करणे, हॉटेलमधून केवळ पार्सल सेवेला परवानगी अशा उपाययोजना सुरू करण्यात आल्या. यामध्ये कोरोनाचा प्रसार व एसटी महामंडळाची प्रवासी वाहतूक सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाचा विचार करता आधीच महामंडळाचा कारभार तोट्यात चालविला जात असल्याचे अनेक वेळा बोलले जाते. त्यातच आता प्रवासी वाहतूक सेवा ३० एप्रिलपर्यंत बंद झाल्यामुळे एसटीची आर्थिक अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. सध्याच्या स्थितीत विभागातील सर्व आगार मिळून दररोज ३० ते ३२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान महामंडळाला सहन करावे लागत आहे.
कोट
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे जरी विभागाकडून वाहतूक सेवा तूर्त काही काळ बंद ठेवावी लागली आहे. यामुळे महामंडळाने दर दिवसाला ३२ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बसेस सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
श्रीकांत गभणे
विभाग नियंत्रक