अमरावती : इव्हिनिंग वॉक करणाऱ्या महिलांना लक्ष्य करणाऱ्या मोबाइल चोरांच्या टोळीच्या मुसक्या आळवण्यात राजापेठ पोलिसांना यश आले आहे.
दुचाकीने येऊन झटका मारून मोबाइल लांबविणाऱ्या टोळीतील चौघांना राजापेठ पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी पकडले आहे. त्यांच्याकडून एकूण ३२ मोबाइल, तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, असा एकूण ४ लाख ३५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ‘ती’ चौकडी मोबाइल चोरीसह विक्रीतही ‘एक्सपर्ट’ असल्याची माहिती तपासादरम्यान निष्पन्न झाली. ही टोळी चोरलेले मोबाइल अल्प किमतीत विकत होती, अशी कबुलीदेखील त्यांनी दिली आहे.
रेहान खान हमीद खान (२६, रा. अलमासनगर, बडनेरा), शेख सलीम शेख युसूफ (३०, रा, गढ्ढा मैदान, बडनेरा), अनिल उत्तम तायडे (४०, रा. राहुलनगर, अमरावती) आणि शुभम दुर्योधन वाघ (२५, रा. माताफैल, बडनेरा), अशी आरोपींची नावे आहेत. या चौकडीने राजापेठ पोलीस ठाण्यासह शहरातील अन्य पोलीस ठाणे व शहराबाहेरसुद्धा मोबाइल चोरी व वाटमारी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून अजूनही काही मोबाइल जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून मोबाइल स्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. अखेर ३१ मार्च रोजी कलम ३९२ अन्वये नोंदविलेल्या गुन्ह्यात राजापेठ पोलिसांनी मोबाइल चोरांची टोळी पकडण्यात यश मिळविले.
मोबाइल चोरणाऱ्या चौघांच्या टोळीने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आरोपींकडून आतापर्यंत ३२ मोबाइल, दुचाकी, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
- भारत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त, राजापेठ विभाग