लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने शनिवारी दिला. त्यामुळे या फार्मसह परिसरातील इतर फार्मवरील ३२ हजारांहून अधिक कोंबड्या रविवारी खोल खड्डा करून शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात येणार आहेत. याविषयीचे आदेश अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी शनिवारी दिले. भानखेडा परिसरात ११ फेब्रुवारीला अज्ञात इसमाने ५० मृत कोंबड्या फेकल्या होत्या. यापैकी दोन कोंबड्यांचे नमुने पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले असता, ‘बर्ड फ्लू’ पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे या परिसरात पशुरोग सर्वेक्षण करण्यात येऊन काही पोल्ट्री फार्मचे चार नमुने तपासणीकरिता भोपाळला पाठविले होते. त्यामध्ये भानखेडा परिसरातील सर्व्हे क्रमांक ५७/२ मधील एका पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांमध्ये हा प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशानुसार अमरावती तालुका बर्ड फ्लू संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी संक्रमित क्षेत्र व सर्वेक्षण क्षेत्राबाबत आदेश जारी केला. या परिसरातील एक किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र व १० किमी त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संक्रमित क्षेत्रातील सर्व देशी कुक्कुट पक्षी, पोल्ट्री फार्ममधील पक्षी, इतर प्रजातीचे पाळीव पक्षी पशुसंवर्धन विभागाच्या स्थापित शीघ्र कृती दलांकडून लक्ष्य करण्यात आले आहे. सर्व फार्मवरील पक्षी खोल खड्डा करून नष्ट करण्यात येतील. कृती दलांकडून ही कार्यवाही होत आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे यांनी दिली.
४० टीम करणार कामभानखेड परिसरातील पोल्ट्री फार्मवरील ४५ दिवसांच्या ३२ हजार कोंबड्यांना बधिरीकरणाचे औषध पाजण्यात येईल व त्यानंतर मान मुरगळून एका पोत्यात त्यांना टाकण्यात येईल. त्यानंतर हे पोते दोन बाय दोन बाय तीन फूट अशा आकाराच्या खड्ड्यात पुरण्यात येईल. तत्पूर्वी, त्या खड्ड्यांत चुना टाकण्यात येणार आहे व या सर्व प्रक्रियेकरिता ४० चमू काम करीत असल्याचे जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पोल्ट्री फार्म संचालकांना मिळणार मोबदला भानखेड परिसरातील एक किमी परिघातील सुमारे ३२ हजार कोंबड्या रविवारी नष्ट करण्यात येत असल्याने संबंधित पोल्ट्री फार्म संचालकांना प्रतिपक्षी ७० रुपये व कोंबड्यांचे खाद्य शिल्लक असल्यास १२ रुपये किलोप्रमाणे मोबदला देण्यात येणार आहे. हे खाद्यदेखील नष्ट करण्यात येणार आहे. संबंधित शेडचे सॅनिटायझेशन केले जाणार असल्याचे डॉ. राहाटे यांनी सांगितले.
एक वर्षापर्यंत ‘तो’ खड्डा इन्फेक्टेड ज्या खड्ड्यात कोंबड्या पुरण्यात येणार आहेत, त्या खड्ड्यावर एक बोर्ड लावण्यात येणार आहे. हा इन्फेक्टेड एरिया असल्याबाबत त्यावर नमूद राहणार आहे. किमान वर्षभर त्या खड्ड्याजवळ जाऊ नये, अशी ताकीद त्यावर अंकित राहणार आहे. याशिवाय संबंधित पोल्ट्री फार्मवर ९० दिवस कुठल्याही पक्ष्यांचे संगोपन करता येणार नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले.
तीन महिन्यांपर्यंत विपणन, विक्रीवर बंदीमृत पक्ष्यांची तसेच पक्षिखाद्य, खाद्य घटक, अंडी, अंड्यांचे पेपर ट्रे, बास्केट, खुराडी, पक्षिखत, विष्ठा आदीही नष्ट करून त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावावी. संक्रमित क्षेत्रातील पक्षी नष्ट करणे, स्वच्छता, निर्जंतुकीकरण झाल्यानंतर सर्वेक्षण क्षेत्रातील उत्पादित कुक्कुट पक्षी व अंडी यांची केवळ त्याच क्षेत्रात अंतर्गत हालचाल व विक्रीस परवानगी राहील. सर्वेक्षण क्षेत्रात बाहेरून येणारे किंवा तिथून बाहेर पाठविण्यात येणारे चिकन प्रक्रियेची उत्पादने, कुक्कुटपक्षी खाद्य व अंडी यांची हालचाल, विपणन व विक्री तीन महिने बंद राहील, असे आदेशात नमूद आहे.
भानखेड परिसरातील एका पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचा नमुना ‘बर्ड फ्लू’ पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे अमरावती एसडीओंच्या आदेशाने रविवारी सकाळपासून किमान ३२ हजार पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात येईल. यासाठी पथकातील सदस्यांद्वारे पीपीई कीट घालून पक्षी नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येईल.डॉ. विजय राहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी