अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी निवडणूक विभाग कामी लागला आहे. या अनुषंगाने ३२३० व्हीव्हीपॅट बंगळुरू (कर्नाटक) येथून २७ मे रोजी उचल करण्यात आलेली आहे. ही यंत्रे २९ मे रोजी विलासनगरात शासकीय गोदामातील सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार आहेत.
अमरावतीलोकसभा मतदारसंघाकरिता भारत इलेक्ट्रानिक्स लिमिटेडमार्फत बीईएल बंगळुरू येथून ही व्हीव्हीपॅट आणण्यात येत आहेत. जिल्ह्यात लोकसभेकरिता २६५७ मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात एक व्हीव्हीपॅट राहणार आहेत. याशिवाय काही मशीन राखीव ठेवण्यात येत असतात. मतदाराने केलेले मतदान त्याच उमेदवाराला झाले का, याची खातरजमा त्या मतदाराला व्हीव्हीपॅटद्वारे मतदान कक्षात करता येते. व्हीव्हीपॅट सुरक्षा कक्षात आणण्यात येत असताना या प्रक्रियेच्या वेळी सर्व राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्षांना याची सूचना जिल्हा निवडणूक विभागाने दिलेली आहे.