अमरावती : मेळघाटातआरोग्याच्या अपुऱ्या सोयी- सुविधेमुळे येथील गंभीर गरोदर व स्तनदा माता तसेच शून्य ते एक महिन्याच्या बालकांना उपचारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे दाखल केल्या जाते. दहा महिन्यांमध्ये मेळघाटातून दाखल झालेल्या ३३ गंभीर बालक तर एका स्तनदा मातेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच बरोबर १४ गंभीर गरोदार मातांनी मृत बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शहरातील डफरीन रुग्णालय हे जिल्ह्यातील इतर सर्वच रुग्णालयाचे रेफर सेंटर आहे. ग्रामीण भागात अपुऱ्या सोयी- सुविधेमुळे गरोदर माता, स्तनदा माता तसेच गंभीर बालकांना याच रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केल्या जाते. यामध्ये सर्वाधिक रेफरचे प्रमाण हे मेळघाटातील आहे. मेळघाटातील आरोग्याच्या अपुऱ्या सोयी-सुविधेमुळे येथे बाल मृत्यू तसेच मातामृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मेळघाटातील बालमृत्यू हा देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
येथील बालमृत्यू थांबविण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार आरोग्य प्रशासनाकडून अनेक उपाययोजनाही राबविण्यात येतात; परंतु, आजही याठिकाणी आरोग्याच्या सुविधा कमी असल्याने माता व बालकांना डफरीन रुग्णालयातच रेफर केले जाते. १ एप्रिल २०२२ ते ३१ जानेवारी २०२३ या दहा महिन्याच्या कालावधीमध्ये मेळघाटातून २३४ गरोदर माता, ९६ स्तनदा माता तर शून्य ते एक महिन्याच्या १२९ बालकांना डफरीन रुग्णालयात रेफर करण्यात आले होते.
नागपूरला रेफर केलेल्या चार बालकांचा मृत्यू
दहा महिन्यात मेळघाटातून डफरीन रुग्णालयात दाखल झालेल्या काही गंभीर रुग्णांना नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. यामध्ये ३३ गरोदर माता, १३ स्तनदा माता तर २२ शून्य ते एक महिन्यांचा बालकांचा समावेश आहे. यातील चार बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून १२ बालकांची प्रकृती सुधारल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सहा बालकांच्या कुटुंबाशी संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती डफरीन रुग्णालय प्रशासनाने दिली.
१४ बालकांचा उपजत मृत्यू
दहा महिन्यात मेळघाटातील २३४ गंभीर गरोदर मातांना डफरीन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील १४ गरोदर मातांच्या बाळाची उपजत मृत्यू झाल्याची नोंद रुग्णालय प्रशासनाकडे आहे.
आरोग्यमंत्र्याचे विशेष मॉडेल आहे कुठे?
मेळघाटातील माता मृत्यू व बालमृत्यू थांबविण्यासाठी मेळघाटला विशेष बाब म्हणून आरोग्य सुविधा पुरविण्याचे तसेच मेळघाटातील आरोग्य सुविधा वाढवून विशेष मॉडेल राबविणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मेळघाट दौऱ्यात म्हटले होते. पंधरा दिवसात हे मॉडेल कार्यान्वित होणार असल्याचे ते म्हणाले होते; परंतु, तीन महिन्यानंतरही मेळघाटला आरोग्यमंत्र्याच्या विशेष मॉडेलची प्रतीक्षा आहे.
मेळघाटातून रेफर करण्यात आलेला प्रत्येक बाळ आणि माता यांची प्रकृती ही गंभीर स्थितीमध्ये पोहाेचलेली असते; परंतु, अशाही परिस्थितीमध्ये माता आणि बाळ दोघांचेही प्राण वाचविण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर सर्व प्रयत्न करतात. जर रुग्णालयातही काही सुविधा अपुऱ्या पडल्यास त्यांना तातडीने नागपूरला रेफर केल्या जाते.
- डॉ. विद्या वाठोडकर, वैद्यकीय अधीक्षक