अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठ संलग्नित अमरावती जिल्ह्यातील ३४ महाविद्यालयांनी इन्स्टिट्यूशनल इन्फॉर्मेशन फॉर क्वालिटी असेसमेंट (आयआयक्यूए) अहवाल ‘नॅक’कडे सादर केला नाही. त्यामुळे या ३४ महाविद्यालयांत यंदा प्रथम वर्ष प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ च्या वर्षासाठी आदेश लागू असेल, असे पत्र कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी गुरुवारी जारी केले आहे. या पत्रामुळे ‘नो नॅक’ असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालकांची भंबेरी उडाली आहे.
कुलसचिवांच्या पत्रानुसार, राज्याचे शिक्षण संचालनालय व विद्यापीठाच्या आयआयक्यूए विभागाचा आधार घेताना ज्या अशासकीय महाविद्यालयांनी आयआयक्यूए नॅक कार्यालयात सादर केला नाही अथवा महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, मानांकन झाले नाही, अशा जिल्ह्यातील ३४ महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ च्या प्रथम वर्षाकरिता कोणत्याच अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रवेश देता नाही, असे स्पष्ट केले आहे. किंबहुना महाविद्यालयांनी हे आदेश अव्हेरून विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थाचालक, प्राचार्य, महाविद्यालयांची राहील, असे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयाेगाच्या गाइडलाइननुसार अनुदानित अथवा विनाअनुदानित महाविद्यालयांना राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेकडून (नॅक) मानांकन करणे अनिवार्य आहे. मात्र, विद्यापीठ संलग्नित जिल्ह्यातील ३४ महाविद्यालयांनी ‘नॅक’ मानांकन केले नाही. ‘नो नॅक’ महाविद्यालयांबाबतचा अहवाल विद्यापीठाने राज्य शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांच्याकडे पाठविल्याची माहिती आहे.
अशासकीय महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन, मानांकन करून घ्यावे, यासाठी आयआयक्यूए विभागामार्फत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला. अनेकदा नॅकबाबत संधी देण्यात आली. मात्र, या प्रकरणी शासनस्तरावर कार्यवाही होत असल्याने विद्यापीठाला कठोर पावले उचलावी लागली. विद्यापीठ संलग्नित १३० महाविद्यालयांनी अद्यापही नॅक मानांकन केले नाही. अशा महाविद्यालयांच्या प्रथम वर्ष प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
- डॉ. तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.