अमरावती : पश्चिम विदर्भातील एज्युकेशन हब असलेल्या अमरावती जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणात ३४ हजार ८५१ जण निरक्षर असल्याचे समोर आले आहे. २०२७ सालापर्यंत टप्प्याटप्याने या निरक्षरांना साक्षर करण्यासाठी शिक्षण विभाग विविध उपक्रम राबविणार आहे.
सर्वांना साक्षर करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून नवभारत साक्षरता उपक्रम हाती घेण्यात आला आहे. निरक्षरांचे सर्वेक्षण, स्वयंसेवक आणि निरक्षरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. शिक्षकांकडून उल्हास पोर्टलवर निरक्षरांची संख्या नोंदवण्यात आली. प्रत्येक १० व्यक्तींसाठी एक असे दोन हजार स्वयंसेवक नियुक्त केले आहेत. अंगणवाडी सेविकांपासून प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी, एनसीसी, नेहरू युवा केंद्रातील तरुण स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. पहिल्यांदा १५ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांना शिकवले जाईल. महिला, मुली, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक, बांधकाम कामगार, मजुरांना प्राधान्याने साक्षर केले जाणार आहे. शाळा भरण्यापूर्वी एक तास व शाळा सुटल्यानंतर एक तास त्या निरक्षरांना जिल्हा परिषदांच्या शाळेतदेखील स्वयंसेवक शिक्षणाचे धडे देत आहेत. आपले सरकार सेवा केंद्रावरही त्यांना मोफत अध्यापन केले जाईल. मोबाइलवरही शिक्षणनिरक्षरांमधील अनेकांना अक्षरओळख नाही, पण अँड्रॉइड मोबाइल चांगल्या पद्धतीने हाताळता येतो. त्यामुळे त्यांना मोबाइलवर ऑनलाइन शिक्षण दिले जाणार आहे. तालुकानिहाय निरक्षरजिल्ह्यात अचलपूर २३५१, अंजनगाव सुर्जी २७७२, तिवसा २२४१, मोर्शी २३५०, वरूड ३१५०, अमरावती ग्रामीण २२४८, नांदगाव खंडेश्वर १५४९, चांदूर बाजार २६२२, धामणगाव रेल्वे ३३९३, दर्यापूर २२७९, धारणी ३९६३, भातकुली ६७४, चिखलदरा १८०४, महापालिका क्षेत्र १००४, चांदूर रेल्वे २४५१ याप्रमाणे सर्वेक्षणात निरक्षर आढळले आहेत. शिक्षणाधिकारी योजना कार्यालयामार्फत या निरक्षरांची नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पहिली परीक्षा लवकरच त्या-त्या तालुक्यातील महसुली गावातील शाळेत घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने तयारी केली आहे.- प्रीतम गणगणे, सहायक योजना अधिकारी निरक्षरतेची कारणे...कुटुंबातील गरिबी, रोजगारासाठी स्थलांतर, पालकांचे छत्र लवकर हरपल्याने दुर्लक्ष, शैक्षणिक वातावरणाचा अभाव, शाळा जवळ नसणे आदी.