अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे तीन दिवसांमध्ये ३५ मुलींचा जन्म झाला आहे. नवरात्र उत्सव-२०२२ निमित्त राज्यशासनाकडून महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत बुधवारी रुग्णालयात मुलीला जन्म दिलेल्या मातांचा खासदार नवनीत राणा यांच्याहस्ते साडीचोळी भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, डफरीनच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या वाठोडकर, तहसीलदार संतोष काकडे, पीसीपीएनडीटी विभागाच्या ॲड. प्रणिता भाकरे, आरएमओ. डॉ. भरत गोहील उपस्थित होते.
समाजासाठी स्त्री जन्म किती महत्त्वाचा आहे, तसेच स्त्रीभ्रूण हत्या थाबविण्याच्या दृष्टिकोनातून समाजात जनजागृती व्हावी, याकरिता मागील चार वर्षांपासून दरवर्षी डफरीन रुग्णालयात नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये मुलीला जन्म घेणाऱ्या महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला जातो. या नऊ दिवसांमध्ये सदर मातांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असलेले पेन खजुराचे पॅकेट देखील वाटप केले जातात. यंदाही हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तीन दिवसांमध्ये रुग्णालयात ३५ मुलींनी जन्म घेतला आहे. त्यामुळे या मुलींचा तसेच त्यांच्या मातांचा खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पीसीपीएनडीटी विभाग व डफरीन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात या मातांना साडीचोळी तसेच पेन खजुराचे पॅकेट भेट देण्यात आले. यावेळी युवा स्वाभिमानचे जितू दुधाने, उमेश ढाेणे, हर्षल रेवणे, सोनू रुंगटा, अजय बोबडे, पवन हिंगणे देखील उपस्थित होते.
बुधवारी मुलांपेक्षा मुलींचा जन्म अधिक
बुधवारी डफरीन येथे एकूण ३० नवजात शिशूंचा जन्म झाला. यामध्ये १८ मुली तर १२ मुलांचा समावेश आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवातील हा दिवस रुग्णालयासाठी अधिक आनंद देणारा होता.
दोनशे बेडच्या नवीन इमारतीचीही केली पाहणी
खासदार नवनीत राणा यांनी डफरीन रुग्णालय परिसरातच बांधकाम सुरू असलेल्या दोनशे बेडच्या इमारतीचीही पाहणी केली. या इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे. रविवारी डफरीन येथे घडलेल्या व्हेंटिलेटरच्या स्फोट प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांनी ही पाहणी केली. इमारतीच्या उर्वरित कामासाठी लागणारा निधी लवकरात लवकर मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगत, दोन ते तीन महिन्यांत हे रुग्णालयाचे उद्घाटन होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.