अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसची चाके थांबली. कोरोना संचारबंदी व लॉकडाउनच्या काळात परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाला दररोज ३५ लाख रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. सध्या सुरू असलेल्या मोजक्याच बसेसच्या माध्यमातून महामंडळाला केवळ १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. परिणामी महामंडळाची आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षाही बिकट झाल्याचे दिसून येत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या विभागात ८ आगारांचा समावेश आहे. जवळपास ३७५ बसेस आहेत. विभागाला यापूर्वी दररोज साधारणत: ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. सर्व बसेस रस्त्यावर धावत होत्या. परंतु १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून कोरोना संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना बसला आहे. केवळ दिवसाला ४ ते ५ फेऱ्या होत आहेत. त्यातही अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच प्रवासास प्राधान्य देण्यात आले असून सर्वसामान्यांना महत्त्वाचे काम जर सोडले तर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सध्या उभ्या आहेत. परिणामी एसटी महामंडळाला दररोज १५ हजार रुपयांचे उत्पन्न समाधान मानावे लागत असून ३५ लाख रुपयांचे नुकसान मात्र सहन करावे लागत आहे.
कोट
राज्य परिवहन महामंडळाला संचारबंदीचा मोठा फटका बसला. अनेक बसेस बंद असल्याने उत्पन्न ठप्प झाले. १ हजार किलोमीटर बसेस धावूनही उत्पन्न मात्र १५ हजार रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे एसटीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
- श्रीकांत गभने,
विभाग नियंत्रक
बॉक्स
विभागातील अत्यावश्यक सेवेसाठी धावत असलेल्या एसटी बसेस साधारणतः १ ते ३ हजार किलो मीटर धावताहेत. यामुळे १५ ते ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र, संचारबंदी लागल्यामुळे दररोजचे ३५ लाखांहून अधिक नुकसान महामंडळाला सहन करावे लागत आहे.