अमरावती : जिल्ह्यातील खासगी ३५ पेट्रोलपंपांना इंधनाचा पुरवठा होत नसल्याने ते २० मार्चपासून बंद आहेत. क्रूड ऑइलच्या दरात वाढ झाल्यामुळे खासगी पेट्रोलपंप बंद असल्याची माहिती आहे. यात इसार, रिलायन्स या खासगी कंपन्यांच्या पेट्रोलपंपांना फटका बसला आहे.
खासगी पेट्रोलपंपांना डिझेल - पेट्रोलचा पुरवठा बंद असल्याप्रकरणी मंगळवारी नागपूर येथे पेट्रोलपंप संचालक आणि पुरवठादार कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी २४ तासांचा वेळ देण्यात यावा, अशी मागणी पुरवठा कंपनीकडून करण्यात आली. घाऊक ग्राहकांसाठी इंधन दरात कंपन्यांनी दरवाढ केली होती. डिझेलच्या दरात जवळपास २५ रुपयांनी दरवाढ झाली. त्या तुलनेत किरकोळ ग्राहकांसाठी इंधन दरात वाढ झाली नाही, हे विशेष.
अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास ३५ खासगी पेट्रोलपंप असून, संपूर्ण राज्यात ही संख्या अंदाजे ६०० च्या वर आहे. इसार, रिलायन्स या खासगी पेट्रोलपंपमालकांनी इंधनाचा पुरवठा व्हावा, यासाठी आगाऊ रक्कमदेखील तेल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिले आहे. मात्र, अद्यापही पंपांना इंधन पुरवठा करण्यात आला नसून ते सर्व टँकर होल्डवर ठेवण्यात आले आहेत. तर, काही टँकर रिकामेच परत पाठविण्यात आले. इंधनाचा पुरवठा होत नसल्याने पेट्रोल टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग अथवा राज्य महामार्गावर खासगी पेट्रोलपंपाचे जाळे आहे. मात्र, त्या तुलनेत अमरावती शहरात खासगी पेट्रोलपंपांची संख्या नाही, अशी माहिती आहे.
युक्रेन - रशिया युद्धाचा परिणाम
राज्य नव्हे तर देशभरातील खासगी पेट्रोलपंपांना इंधन पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गतकाही दिवसांपासून युक्रेन - रशिया या दोन देशात सुरू असलेल्या युद्धामुळे सर्वच बाबींबर परिणाम होत आहे. विशेषतः क्रूड ऑइलचे दर वधारल्याने पेट्रोल, डिझेलच्या दराने मोठी झेप घेतली आहे. इंधनाच्या दरात उचल खाल्ल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
२० मार्चपासून इंधनचा पुरवठा बंद आहे. यासंदर्भात नागपूर येथे खासगी पेट्रोलपंपचालकांची बैठक झाली. इसार कंपनीच्या विभागीय कार्यालयातही भेट देण्यात आली. मात्र, इंधनाचा पुरवठा बंद असल्याने पेट्रोलपंपांना टाळे लागले आहे.
- निर्मल भोयर, संचालक, नांदगाव खंडेश्वर पेट्रोलपंप