अमरावती : आपल्याच शाळेतील दोन लहानग्या विद्यार्थींनींना बॅड टच केल्याच्या आरोपात शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या ३५ वर्षीय शिक्षकाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे त्याला आणखी दोन रात्री शहर कोतवाली ठाण्याच्या हवालातीत काढाव्या लागणार आहेत. मर्विन असे अटक शिक्षकाचे नाव आहे. तर, शनिवारी पालक व राजकीय कार्यकत्यांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारला.
याप्रकरणी, शहर कोतवाली पोलिसांनी संबंधित शाळा मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.२७ मिनिटांच्या सुमारास विनयभंग व पॉस्को अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभिर्य ओळखून शहर कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी आरोपी शिक्षकाला शुक्रवारीच तातडीने अटक केली. शनिवारी त्याला पॉस्कोच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
पोलिसांनी त्याच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, पीसीआर का, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर तपास अधिकारी, सरकारी वकील व शहर कोतवाली पोलिसांनी प्रभावीपणे पीसीआर मिळण्याबाबत बाजू मांडली. सबब, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याने अन्य काही विद्यार्थीनींना बॅड टच वा तसा प्रयत्न केला का, याबाबत त्याला पोलीस कोठडीदरम्यान बोलते केले जाणार आहे. शहर कोतवाली पोलीस त्याच्याकडून नेमका कसा उलगडा करवून घेते, याकडे शैक्षणिक वर्तुळासह पालकांचे लक्ष लागले आहे.
पालक, राजकीय कार्यकत्यांनी विचारला जाब
इंग्रजी माध्यमाच्या त्या नामांकित व हायप्रोफाईल शाळेतील अल्पवयीन चिमुकल्या विद्यार्थींनीसोबत ‘बॅड टच’ चा प्रकार सोशल व्हायरल होताच शेकडो पालक व राजकीय कार्यकत्यांनी शनिवारी दुपारी ते हायस्कुल गाठून तेथील मुख्याध्यापकांना भेटण्याची विनंती केली. मात्र मुख्याध्यापक संतप्त पालक व राजकीय कार्यकत्यांना सामोरे गेले नाहीत. त्यामुळे तेथील अन्य शिक्षकांना त्या घटनेबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक (ठाकरे गट) राहुल माटोडे हे कमालिचे आक्रमक झाले होते. शिवसेनेचे महानगरप्रमुख पराग गुडधे व कॉग्रेसच्या समीर जवंजाळ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकत्यांनी देखील शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला.
पोलिसांनी घेतली सामंजस्याची भूमिका
आपल्याला त्या मुख्याध्यापकाला जाब विचारायचा आहे, यावर माटोडे, गुडधे व जवंजाळ आग्रही होते. पालक व कार्यकत्यांचा रोष पाहता राजापेठचे एसीपी शिवाजी बचाटे व कोतवालीचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी मोर्चा सांभाळला. पोलिसांनी पालक, कार्यकर्ते व शाळा व्यवस्थापनात संवाद घडून यावा, यासाठी सामंजस्याची भूमिका घेतली. यावेळी हायस्कुल आतबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.