अमरावती : शहरांमधील मैलाचे १०० टक्के व्यवस्थापन करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे राज्यात पूर्णत: अस्तिवात असलेल्या २१ मलनि:सारण प्रक्रिया केंद्र अर्थात एसटीपींना ३६ शहरांतील मलनि:सारणाचा भार सोसावा लागणार आहे. ज्या ३६ शहरांत एसटीपी अस्तिवात नाही, त्या शहरांनी एसटीपी असलेल्या शहरांमध्ये मैला पाठविणे व त्या शहरांनी हा मैला स्वीकारणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ज्या शहरांमध्ये एसटीपी अस्तिवात नाही, परंतु, ती शहरे एसटीपी असलेल्या शहरांच्या २० किलोमीटर परिघात आहेत, त्या शहरांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मैला स्वीकारणाऱया शहरांना कोणतेही अतिरिक्त शुल्क घेता येणार नाही. याप्रकारे एसटीपी नसलेल्या शहरांमधील मैलाचे १०० टक्के व्यवस्थापन करून त्या मैलावर प्रक्रिया करण्याचे निर्देश नगरविकास विभागांनी ३६ नगरपालिका, महापालिका व नगरपंचायत प्रशासनाला दिले आहे.
या ठिकाणी आहेत एसटीपीअमरावती, औरंगाबाद, नवी मुंबई, कोल्हापूर, नागपूर, नांदेड वाघाडा, नाशिक, पिंपरी चिंचवड, सांगली, चंद्रपूर महापालिकेसह शिरवडे-वरवडे, इचलकरंजी, कराड, लोणावळा, पाचगणी, शेगाव, शिर्डी, कुळगाव - बदलापूर, सासवड, वाशिम व अंबरनाथ नगरपरिषदेत एसटीपी आहेत. या महापालिका व नगरपालिकांच्या २० किलोमीटर परिघात असलेल्या ३६ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मैला या २१ शहरांतील एसटीपीवर पाठवावा लागणार आहे.
या ३६ शहरांना होणार लाभ भातकुली, खुल्दाबाद, उरण,पन्हाळा, वडगाव कसबा, वाडी, वानाडोंगरी, महादुला, कामठी, कन्हान पिंपरी, हिंगणा, अर्धापूर, मुदखेड, भगूर, आयंदी, चाकण, तळेगाव, जयसिंगपूर, तासगाव, बल्लारपूर, राजुरा, सिंदखेड, कुरंदवाड, कडेगाव, खोपोली, खालापूर, मेढा, खामगाव, बाळापूर, कोपरगाव, राहता, कर्जत, मुरबाड, जेजुरी, मालेगाव, उल्हासनगर या शहरांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतागृहांचा मैला एसटीपी असलेल्या २१ शहरांमधील नजीकच्या शहरांत पाठवावा लागणार आहे.