अमरावती : जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे ३ कोटी ८० लाखांच्या शाळा दुरुस्तीच्या ११४ पैकी पाच लाखांच्या एका कामासाठी तब्बल ३८ सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी दावेदारी ठोकली. याबाबत अधिकाऱ्यांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जिल्हा नियोजन समितीकडून सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीकरिता सुमारे ३ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मिळाला. यामध्ये २७० शाळा दुरुस्तीची कामे मंजूर झाली. यापैकी १५६ कामे ग्रामपंचायती करणार आहेत, तर उर्वरित ११४ कामे ही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना द्यायची आहेत. याकरिता बांधकाम विभागाने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडून लेखी अर्ज मागविले होते. याकरिता जळपास एक हजारांवर कामे मागणी अर्ज प्राप्त झाले होते.
प्राप्त अर्जानुसार २९ मे राेजी झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सीईओ अविश्यांत पंडा यांच्या उपस्थितीत काम वाटप समितीची सभा घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, उपअभियंता राजेश लाहोेरे, लेखाधिकारी मनीष गिरी व अन्य उपस्थित होते. प्रशासनाने लॉटरी पद्धतीने ही कामे वितरित केली. पहिल्यांदा गोंधळाविना सभा
एरवी जिल्हा परिषदेत काम वाटप सभा म्हटली की, गोंधळ उडायचा. वेळप्रसंगी पोलिसांनाही पाचारण केले जात होते. मात्र, सोमवारी पार पडलेली काम वाटप सभा ही बहुदा पहिल्यांदाच गोंधळाविना पार पडली.