लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्यात काही ठिकाणी संततधार पाऊस तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २३४ जिल्हा परिषद शाळांमधील वर्गखोल्या बाधित झाल्या आहेत. पावसामुळे मोडकळीस आलेल्या प्राथमिक शाळांच्या या इमारती कधीही कोसळू शकतात. शिक्षण विभागाकडे ७ कोटी ४९ लाख ७१ हजार रुपयांचा प्रस्ताव सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून आले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने या निधीेचा प्रस्ताव तयार केला असून, तो जिल्हा नियोजन समितीपुढे सादर केला जाणार आहे.यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा चार टक्क्यांनी पाऊस जास्त झाला. मागील पंधरवड्यात सर्वत्र संततधार पाऊस झाला, तर अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. पावसामुळे अनेक शाळांतील वर्गखोल्यांची तसेच इमारतीचीदेखील पडझड झाली आहे. अनेक शाळांच्या भिंतींना तडे गेले आहेत. वर्गखोल्यांपुढील पडवीची पत्रे उडाली आहेत. काही ठिकाणी भिंतींना भेगा पडल्या, तर अनेक ठिकाणी शाळा इमारतीच्या भिंती कोसळल्या. शौचालयाची दुरवस्था झाली आहे. पाण्याची टाकी, संरक्षण भिंती कोसळल्या आहेत. शाळांमधील भिंतींमध्ये ओलावा पसरला आहे. शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळले. किचनशेड व स्वच्छतागृहांची अवस्था बिकट झाल्यामुळे ते कधीही कोसळू शकते. अशी शाळांची अवस्था झाल्यामुळे तेथे विद्यार्थ्यांना विद्यार्जन करणे अवघड झाले आहे. सध्या यापैकी काही शाळांतील विद्यार्थ्यांची ग्रामपंचायतीच्या कार्यालयात, समाजमंदिरात व्यवस्था करण्यात आली आहे.दरम्यान, शिक्षणमंत्र्यांनी अतिवृष्टीने बाधित शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी देण्याची घोषणा केली. त्यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी दिल्या होत्या. शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या २३४ शाळांकरिता ७ कोटी ४९ लाख ७१ रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी व वर्गखोल्यांचे प्रत्यक्ष काम केव्हा प्रारंभ होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
२३४ वर्गखोल्या बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 1:17 AM
यंदाच्या पावसाळ्यात काही ठिकाणी संततधार पाऊस तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २३४ जिल्हा परिषद शाळांमधील वर्गखोल्या बाधित झाल्या आहेत. पावसामुळे मोडकळीस आलेल्या प्राथमिक शाळांच्या या इमारती कधीही कोसळू शकतात.
ठळक मुद्देपावसाचा फटका : दुरुस्तीसाठी ७.४९ कोटींचा डीपीसीकडे प्रस्ताव