धामणगाव रेल्वे (अमरावती) : काही दिवसांमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज होत असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालाचोरीचे ग्रहण लागले आहे. एका महिन्यात तब्बल चार लाखांचे रस्ता सुरक्षेसाठी लावलेले क्रॉस मेटल बिम चोरीला गेले आहेत.
विदर्भाच्या आर्थिक सुबत्तेसाठी वरदान ठरणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. काही दिवसांमध्ये हा मार्ग रस्ते विकास महामंडळाकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. मात्र, रस्त्याच्या बाजूला लागलेले क्रॉस मेटल बिम चोरीला जात आहेत. विशेष म्हणजे, हे बिम काढून ट्रॅक्टरद्वारे चोरून नेले जात असल्याची माहिती आहे. जवळा धोत्रा, वाई बोथ या भागातून ही बिमची चोरी झाली आहे. प्रत्येकी दहा-बारा फुटांच्या बिमची किंमत बाजारात प्रत्येकी दहा ते बारा हजार रुपये आहे.
पोलिसांचे कानावर हात
मागील दोन महिन्यात क्रॉस मेटल बिमची चोरी झाल्याच्या तक्रारी एनसीसी कंपनीने तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात दिल्या आहेत. या घटनेचा तपास वेगाने होणे गरजेचे असताना अद्यापही आरोपी मिळाले नाहीत. वाई बोथनंतर दुसरी घटना जवळा धोत्रा येथे घडली. तब्बल चार लाखांच्या महत्त्वाच्या रस्ता सुरक्षेच्या क्रॉस मेटल बिम चोरीला गेले असताना पोलिसांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसून येते.
रस्ते सुरक्षा समिती लक्ष देणार कधी?
रस्ता वाहतुकीसाठी सजवताना चोरीचे ग्रहण लागल्याने या गंभीर बाबीकडे आता लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची सुरक्षेची सध्या जबाबदारी टास्क फोर्स म्हणून जिल्हा नियंत्रण समितीकडे आहे. यात रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार या समितीमध्ये आहेत. या समितीने लक्ष दिल्यास चोरीच्या घटना टाळल्या जाऊ शकतात.
समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये हा रस्ता रस्ते विकास महामंडळाकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. मात्र, क्रॉस मेटल बिमची चोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही चोरी थांबली नाही, तर रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुढे गंभीर होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा तपास लावणे गरजेचे आहे.
- नीरज कुमार, मॅनेजर, एनसीसी कंपनी