लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी महामंडळाचे शासकीय सेवेत विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या चार महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही चालूच आहे. परिणामी जिल्ह्यात ६० टक्के वाहतूक अद्यापही बंद आहे. तर ४० टक्के वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. अमरावतीसह जिल्ह्यातील ८ आगारांमध्ये ३६३ पैकी आजघडीला १२७ गाड्या ४१४ फेऱ्या मारत आहेत.नोव्हेंबर महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. सुरुवातीला या संपाची धार तीव्र होती. संपातील काही कर्मचारी पुन्हा सेवेत विलीनीकरणाशिवाय कामावर येण्यास इच्छुक नव्हते. मात्र काही कर्मचाऱ्यावर निलंबन,सेवा समाप्ती, बडतर्फी अशा कारवाई सुरू झाल्यानंतर कारवाईच्या धास्तीने अनेक कर्मचारी कामावर हजर होऊ लागले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुसऱ्या बाजूला महामंडळातर्फे रोजंदारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ लागली. अमरावती आगारातून सध्या ३३, बडनेरा १२, परतवाडा १५, वरूड १६, चांदूर रेल्वे १७, दर्यापूर १०, मोर्शी १७, चांदूर बाजार ०८, अशा एकूण १२७ गाड्या धावू लागल्या आहेत. दररोज या गाड्यांची सुमारे २९ हजार ७७१ किलोमीटरचा प्रवास करीत आहे. त्यामध्ये सरासरी दररोज २२ हजार ६६० प्रवासी प्रवास करीत आहेत. यापूर्वी दररोज सरासरी ३५ लाखांचे उत्पन्न सध्या २० लाखावर आले आहे. त्यामुळे नेहमी तोट्यातच असणारी एसटीचा पुन्हा तोट्यातच चाके आहेत. कामगार हजर न झाल्याने एसटी प्रशासनाकडून आतापर्यंत ४५० निलंबन कारवाई करण्यात आली आहे. निलंबितांपैकी काही जण कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे १३०० कर्मचारी आजही आपल्या मागणीवर ठाम असून ते कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेऊन बसेस चालविलेल्या जात आहेत.
खासगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणीजिल्ह्यात अद्यापही पूर्ण क्षमतेने एसटी वाहतूक सुरू झाली नाही. त्याचा फायदा खासगी वाहतूकदार घेत आहेत. काही भागात ऑटो रिक्षा, टॅक्सीचालक,टॅव्हल्सचालक मनमानी दराने भाडे घेऊन प्रवाशांची लूट करीत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढणे प्रवाशांसाठी आवश्यक आहे.