अमरावती : ऑगस्टमधील पावसाचा खंड व त्यात ‘येलो मोझॅक’ या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे सोयाबीनचं पीक पिवळे पडून करपायला लागले आहे. यासह खोडकुज, मूळकूज या रोगांचाही प्रादुर्भाव पिकावर झालेला आहे. यासाठी पीकविम्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे प्राधान्याने पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये दिले आहेत.
या अनुषंगाने कृषी विभागाची तयारी सुरू आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ३० ते ४० हजार हेक्टरमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यात याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. तसे पाहता सर्वच तालुक्यातील सोयाबीन या रोगामुळे काही प्रमाणात पिवळे पडले असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड, त्यानंतर सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, वातावरणात झालेला बदल यामुळे सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे शेंगात दाणे भरत नसल्याने शेतकऱ्यांनी सांगितले. शासनाने पीकविमा कंपनीलाही तसे निर्देश द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.