चार प्रकरणांत ताकीदपत्र : ३८ प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रियाअमरावती : कृषी विभागाच्यावतीने सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खतांचे ४४९ नमुने घेण्यात आले. यापैकी ४२ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यापैकी चार प्रकरणांत ताकिद देण्यात आली, तर ३८ प्रकरणांत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.जिल्ह्यात सर्व पंचायत समित्यांचे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तीन विभागीय कृषी अधिकारी व तंत्र अधिकारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक, मोहीम अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक असे एकूण ४० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. या सर्व पथकाला यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्व कृषी केंद्राच्या तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके मिळण्याकरिता तालुकास्तरावर १४, जिल्हास्तरावर एक, असे एकूण १५ भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच १ मे पूर्वी सर्व भरारी पथके कार्यरत होऊन जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्रुटी व अनियमितता आढळल्यास हंगामापूर्वीच कार्यवाही करण्याबाबत सर्व गुणनियंत्रण निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत.सन २०१६-१७ मध्ये रासायनिक खताची एक पोलीस केस दाखल करण्यात येऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राघवेंद्र फर्टीलायझर प्रा. लि. कोल्हापूर यांचे सेंद्रीय खताचे नावाखाली ग्रेड व घटक छपाई नसलेल्या १४३ बॅग किंमत एक लाख ४३ हजार २५० रुपयांचा साठा आढळून आला होता. तसेच खरीप हंगामात बीटी कपाशीच्या ३ व इतर बियाण्यांच्या ७६ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व प्रकरणात पंचनामे करून संबंधित शेतकऱ्याला अहवाल देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)अप्रमाणित नमुन्यांवर कार्यवाहीजिल्ह्यात ४२ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यामध्ये ४ प्रकरणात ताकिदपात्र, ३८ मध्ये न्यायालयीन कारवाई सुरू आहे. कीटकनाशकाचे ११ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले, तर बियाण्यांचे ३४ नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले आहे. यामध्ये १२ नमुने ताकिदपात्र व २२ नमुने कोर्टकेस पात्र आहे. तक्रारीसाठी ‘टोल फ्री’ क्रमांकाची सुविधाजिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोईकरिता व तक्रार निवारण करण्यासाठी १८००२३३४००० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. मागील हंगामात या क्रमांकावर फक्त आठ तक्रारी प्राप्त झाल्यात त्या सर्व शेतकऱ्यांचे शंका निरसन करण्यात आले. या क्रमांकावर शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन केले आहे.
रासायनिक खतांचे ४२ नमुने अप्रमाणित
By admin | Published: April 19, 2017 12:12 AM