जिल्हाधिकारी : मेळघाटात ७ डॉक्टरांची पदस्थापना अमरावती : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार जिल्हास्तरावर विकेंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर ४३ डॉक्टरांच्या नियुक्ती करण्यात आल्या असून ७ डॉक्टरांची मेळघाटात पदस्थापना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार जिल्हास्तरावर विकेंद्रित केल्यामुळे शासकीय आरोग्य केंद्रात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. स्थानिकरित्या डॉक्टर्स उपलब्ध होत आहेत. पहिल्या टप्प्यात १४ विशेषज्ञ आणि २९ एमबीबीएस अशी ४३ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी ७ डॉक्टरांची मेळघाट क्षेत्रात पदस्थापना देण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले.यामध्ये चुरणी ग्रामीण रूग्णालय १, चिखलदरा ग्रामीण रूग्णालय १, उपजिल्हा रूग्णालय धारणी २, प्राथमिक आरोग्यकेंद्र काटकुंभ १, प्राथमिक आरोग्यकेंद्र सादराबर्डी १, प्राथमिक आरोग्यकेंद्र धुळघाट येथे १ अशा ७ एमबीबीएस डॉक्टरांना मेळघाटात पदस्थापना देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील आरोग्य सेवेत आमुलाग्र बदल होणार आहे. विशेष करून मेळघाटातील नावारुपास आलेली कुपोषणाची मुळासकट निखंदून काढण्यासाठी तसेच माताबालकांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी विशेष मदत शासनामार्फत देण्यात येणार आहे. या प्रयत्नामुळे मेळघाटातील कुपोषण कमी होण्यास मदत होणार आहे. शासनाचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याची प्रतिक्रिया मेळघाटात व सर्व सामान्य नागरिकांत उमटत आहे. (प्रतिनिधी)
जिल्हास्तरावर ४३ डॉक्टरांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2016 12:23 AM