अमरावती : जिल्ह्यात कोरोना संदर्भात आतापर्यंत ३,१२,५६६ नमुन्यांची तपासणी झालेली आहे. यात सरासरी १५.२४ टक्के पॉझिटिव्हिटी राहिली आहे. या काळात विद्यापीठ लॅबमध्ये १५.६५ टक्के अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. याशिवाय ४०.५० टक्के पॉझिटिव्हिटी पीडीएमएमसी लॅबमध्ये व अन्य खासगी लॅबमध्ये तपासणी झालेल्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक ४४.२३ टक्के पॉझिटिव्हिटी नोंदविली गेल्याचे वास्तव आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३,१२,५६६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात आतापर्यंत ४७,६७९ नमुने पॉझिटिव्ह नोंदविलेले गेले. ही १५.२४ टक्केवारी आहे. यात २,६३,६३२ नमुने निगेटिव्ह, तर ८२९ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात १,३७,६४३ रॅपिड अँटिजेन नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यात १३,३०० नमुने पॉझिटिव्ह आलेत. या चाचण्यांमध्ये ९.६६ नमुने पॅझिटिव्ह नोंदविल्या गेले. या चाचणीत निगेटिव्ह अहवाल आल्यानंतर त्या रुग्णाला आरटी-पीसीआर चाचणी करावी लागते.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या चाचण्या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपासून सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी व्हायची. त्यावेळी तिसऱ्या-चौथ्या दिवशी तपासणी अहवाल मिळत असत. नंतर त्या लॅबमध्ये नमुन्यांची संख्यावाढ झाल्याने वर्धा व अकोला जिल्ह्यातील शासकीय प्रयोगशाळेत नमुने तपासणीसाठी पाठविले जाऊ लागले व नागपूर येथील एका खासगी लॅबद्वारेही नमुन्यांचे संकलन केले गेले. त्यानंतर मे महिन्यात अमरावती विद्यापीठाची लॅब तयार झाल्याने सर्वच नमुने या लॅबमध्ये तपासणी होत आहे.
बॉक्स
खासगीत रॅपिड अँटिजनेला मनाई
जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन चाचणी करणाऱ्या काही खासगी प्रयोगशाळांच्या तपासणी अहवालात तफावत आढळल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच ११ प्रयोगशाळांची मान्यता रद्द केलेली आहे. या लॅबद्वारा आयसीएमआरच्या पोर्टलवर वेळीच माहिती नोंदवित नाही व त्यांनी दिलेले काही कोरोना रिपोर्ट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.
बॉक्स
खासगी लॅबच्या नमुन्यांत ४४.२३ टक्के पॉझिटिव्ह
जिल्ह्यात काही खासगी लॅबद्वारा कोरोना काळात आतापर्यंत आरटी-पीसीआरचे १७,४३७ नमुने तपासणी करण्यात आली. यात ७,७१३ नमुने पॉझिटिव्ह नोंदविल्या गेले आहेत. यात पॉझिटिव्हिटी ४४.२३ टक्के आहे. ९,७१९ नमुने निगेटिव्ह असल्याचा जिल्हा शल्यचिकित्सकांचा अहवाल आहे.
बॉक्स
पीडीएमएमसी लॅब दुसऱ्या क्रमांकावर
येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे विषाणू परीक्षण प्रयोगशाळेत आतापर्यंत आरटी-पीसीआरचे ८,५७२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ३,४७३ नमुने पॉझिटिव्ह नोंद झाली आहे. ही पॉझिटिव्हिटी ४०.५० टक्के आहे. या लॅबमध्ये ५,०१७ नमुन्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. प्रलंबित अहवाल निरंक आहेत.
पाईंटर
नमुने तपासण्यांची जिल्हास्थिती
एकूण नमुने : ३,१२,५६६
आतापर्यंत पॉझिटिव्ह :४७,६७९
एकूण निगेटिव्ह : २,६३,६३२
अद्याप प्रलंबित :८२९
पॉझिटिव्हिटी :१५.२४