अमरावती : जिल्हा परिषदेच्या काही विभागात दोन वर्षानंतर ही निधी अखर्चित राहत असताना मात्र स्वच्छ भारत मिशन विभागाने चक्क तीन महिन्यातच ४ कोटी ४७ लाख रूपयांचा विविध उपक्रमांवर खर्च केला आहे. त्यामुळे विभागातील पाच जिल्ह्यात हा विभाग खर्चात हा विभाग अव्वल ठरला आहे. यामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन योजनेकरिता हा खर्च करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन चालविल्या जाते. या विभागाला सन २०२३ २४ या चालू आर्थिक वर्षांकरिता ५ कोटी ५५ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. मार्च २०२३ मध्ये या विभागाला शासनाकडून हा निधी सुपूर्द करण्यात आला.
सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी १ कोटी ३ लाख ४० हजार, सांडपाणी व व्यवस्थापनासाठी ३ कोटी ९६ लाख वैयक्तिक शौचालयाकरिता ५५ लाख ४० हजारांचा निधी प्राप्त झाला. यामधून सार्वजनिक स्वच्छतागृहाकरिता ७३ लाख ५० हजार,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाकरिता ३ कोटी ३ लाख व वैयक्तिक शाैचालयाकरिता ४४ लाख २८ हजारांचा निधी या तीन महिन्यातच खर्च करण्यात आला आहे. याची टक्केवारी ८०.६० टक्के एवढी आहे. या खर्चाकरिता मार्च २०२४ पर्यंत मुदत होती. परंतु या विभागाने तीन महिन्यातच हा खर्च करून विभागात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गतिमान खर्च करणाऱ्या तालुक्यांमध्ये चिखलदरा, अमरावती, दर्यापूर आणि वरूड या चार तालुक्यांचा समावेश आहे.या तालुक्यांत शंभर टक्के निधी खर्च झाला आहे. अचलपूर आणि अंजनगाव सुर्जी तालुक्याचा खर्च ९९ टक्क्यांच्या वर आहे. मात्र खर्च करण्यात मोर्शी आणि भातकुली हे दोन तालुके माघारले असल्याचे सूत्रांनी सांगितले. ग्रामीण भागात कामेही प्रगतिपथावरजिल्हा परिषद स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध योजनेंतर्गत कामे केली आहे. जिल्हा परिषद स्वच्छता विभाग पुढे आहे. तीन महिन्यात ४ कोटींच्या वर निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.