अमरावती : मान्सून विलंबाने आला असला तरी जुलैमध्ये चांगलाच सक्रिय झालेला आहे. यादरम्यान जिल्ह्यात आठ वेळा २४ मंडळात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या आपत्तीमुळे जिल्ह्यात ४५३५३.०७ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ११५ हेक्टरमधील शेती खरडून गेल्यानेही शेताचे नुकसान झाले आहे. या बाधित पिकांचे पंचनामे आता सुरू झाले आहे.
जिल्हा प्रशासनाचा हा नजरअंदाज प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये काही प्रमाणात क्षेत्रवाढ होण्याची शक्यता आहे. या आपत्तीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा पाण्यात बुडून, वीज पडून व अंगावर भिंत पडून मृत्यू झालेला आहे. याशिवाय लहान-मोठ्या १०५ जनावरांचाही मृत्यू या आपत्तीमध्ये झालेला आहे. अद्याप एकाही प्रकरणात सानुग्रह अनुदान देण्यात आलेले नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
या आपत्तीमध्ये १२९२ घरांची पडझड झालेली असून ४० घरे पूर्णत: नष्ट झाल्याने संसार उघड्यावर आले आहे. या आपत्तीग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदान देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.