अमरावती : हरभरा खरेदीसाठी नाफेडचे पोर्टलच जिल्हात दोन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने ४६ खरेदी केंद्रांना टाळे लागले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे फावले. बाजार समित्यांमध्ये पाच दिवसांत क्विंटलमागे ३०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव पडले आहेत. हे षडयंत्र असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
केंद्र शासनाने हरभऱ्यासाठी यंदा ५३३५ रुपये क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात खासगीमध्ये हा भाव मिळत नसल्याने नाफेडद्वारे डीएमओच्या दहा, व्हीसीएमएफच्या १० व अन्य सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनीच्या १६ अशा एकूण ४६ केंद्रांमध्ये साधारणपणे पाच लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आलेली आहे. नाफेडद्वारा जिल्ह्यातील एकूण हरभरा उत्पादनाच्या २५ टक्के हरभरा खरेदीचे लक्ष्यांक देण्यात आले होते व ही खरेदी झाल्याने आता बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे अडचणीतील शेतकऱ्यांना खासगीमध्ये हरभरा विक्रीशिवाय पर्यात उरला नाही. यामध्ये दर पडल्याने आता शेतकऱ्यांची लूट होत आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी व सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहे. त्यामुळे रब्बीवरच या सर्व शेतकऱ्यांची मदार होती. मात्र, हरभऱ्याला सुरुवातीपासूनच भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च पदरी पडणार की नाही, अशी शक्यता आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निदर्शने
जिल्ह्यात हरभऱ्याची खरेदी बंद करण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांनी शुक्रवारी जिल्हा विपणन कार्यालयात निदर्शने केली. अवकाळी वातावरणाने शेतकरी केंद्रांवर हरभरा आणू शकले नाहीत, त्याममुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.