अमरावती : महापालिका क्षेत्रातील नागरिकांना कोरोना संसर्गजन्य आजाराविषयी माहिती देऊन त्यांन्या शंकांचे निरसन करण्यासाठी खासगी ४७ डॉक्टरांनी आता पुढाकार घेतला आहे. सोमवारपासून दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत ८४०८८१६१६६ या क्रमांकावर प्रश्न मांडता येणार आहे. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या पुढाकाराने सदर उपक्रम सुरू होत आहे.
आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी खासगी डॉक्टरांची बैठक झाली. यात कोरोना तपासणी, करावयाच्या उपाययोजना, कोरोनाग्रस्तांनी घ्यावयाची काळजी याविषयी चर्चा झाली. यावेळी आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिनेश ठाकरे, डॉ. सचिव संदीप दानखेडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी विशाल काळे आदी उपस्थित होते. खासगी डॉक्टरांनी यात बालरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, फिजिशियन व इतर वैद्यकीय विषयांचे तज्ज्ञांनी नागरिकांच्या शंकाचे निरसन व त्यांना कोरोना आजाराविषयी मार्गदर्शन करण्याचे मान्य केले आहे.