अमरावती : स्थानिक राधानगरात रस्ता निर्मितीसाठी जमीन अधिग्रहण करण्यात आले असताना, तीन
वर्षापासून मोबदला मिळाला नव्हता. अखेर गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोन वकिलांसह जमीनमालक महापालिकेत धडकले. मोबदल्याची रक्कम द्या, अन्यथा जप्ती करू, अशी नोटीस घेऊन बेलिफ दाखल झाले. अखेर जमीनमालकाला मोबदल्यापोटी ४.७० लाखांचा धनादेश दिल्यानंतर न्यायालयातून आलेली जप्ती टळली. यादरम्यान प्रशासनाची दमछाक झाली, हे विशेष.
जुगलकिशोर यादव यांच्या मालकीची २१० चौरस मीटर जागा रस्ता निर्मितीसाठी २०१८ ताब्यात घेण्यात आली होती. शासकीय दरानुसार महापालिकेकडून जागेची रक्कम त्वरित मिळणे अपेक्षित होते. मात्र, महापालिका प्रशासनाने यादव यांना प्रचलित पद्धतीनुसार ‘तारीख पे तारीख’ अशी वागणूक दिली. जुगलकिशोर यादव हे महापालिकेत जमीन मोबदला मिळण्यासाठी सतत येरझारा मारून थकले होते. आयुक्त, उपायुक्त, विधी अधिकारी, सहायक संचालक नगर रचना अधिकारी यांना अनेकदा त्यांनी भेटून कैफीयत मांडली. मात्र, महापालिका प्रशासनाने त्यांना मोबदला दिला नव्हता. अखेर यादव हे त्रस्त झाले आणि गुरुवारी त्यांनी महापालिकेत दोन वकिलांसह धडक देत मोबदला मागितला. मोबदल्याचे धनादेश मिळण्यास विलंब होत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले.
दरम्यान, सुरक्षा यंत्रणाही अवाक् झाली. महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर हा प्रकार सुरू असताना नेमके सुरू आहे, हे कळत नव्हते. मात्र, सहायक संचालक नगर रचना विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची फाईल घेऊन धावाधाव सुरू असताना काही तरी झाले, हे बरेच काही सांगून गेले.
कोट
रस्ता बांधकामाच्या मोबदल्यात जमीन अधिग्रहणाची रक्कम मालकाला देणे बाकी होते. भूसंपादनाचे ४.७० लाख रूपये देण्यात आले आहे.
- प्रशांत राेडे, आयुक्त, महापालिका