गजानन मोहोड, अमरावती: शेतकऱ्यांच्या पीक कर्जांची परतफेड ही जिल्हा बँकेच्या व्याजात जमा होत असल्याने मुद्दल तसेच राहत आहे. अशा परिस्थितीत वाढत चाललेली अनिष्ट तफावत (इम्बॅलन्स फिगर) ही सध्या ४८० कोटी ११ लाख ५१ हजारांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे गावपातळीवर सहकाराचा कणा असलेल्या सेवा सहकारी सोसायट्यांना घरघर लागली आहे.
यामध्ये जिल्ह्यातील ६०१ पैकी तब्बल ५३६ सोसायट्या अवसायनाच्या उंबरठ्यावर असल्याचे वास्तव आहे. या सर्व सेवा सहकारी सोसायट्यांना सहकार विभागाद्वारा यापूर्वी अवसायनात का काढू नये, यासंदर्भात नोटीस बजाविण्यात आलेल्या आहेत. ही बाब सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या निदर्शनात आणून देण्यात आली होती व त्यांनी दिलेल्या तोंडी आदेशानंतर सोसायट्या अवसायनात काढण्याच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली आहे. मात्र, ही स्थगिती तात्पुरती सोसायट्यांचा श्वास गुदमरत आहे.