अमरावती : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये नामवंत खासगी प्रशिक्षण संस्थेच्या साहाय्याने अभियांत्रिकी (जेईई) आणि वैद्यकीय (नीट) प्रवेश परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता आदिवासी विद्यार्थ्यांनाही नीट, जेईईचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. यासंदर्भात आदिवासी विकास विभागाने ८ जून २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
‘लोकमत’ने २५ मार्च २०२३ रोजी ‘आदिवासी विद्यार्थ्यांना नीट, जेईईचे मोफत प्रशिक्षण द्या’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर शासन स्तरावर वेगवान हालचालीनंतर गुरुवारी शासनादेश जारी करण्यात आला. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य माॅडेल निवासी शाळा यापैकी कोणत्याही एका शाळेमध्ये एक तुकडी वैद्यकीय व दुसरी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा तयारी करण्यासाठी बनविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांची निवड करताना प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यात एकाचवेळी प्रवेश परीक्षा घेऊन अंतिम गुणवत्ता यादीमध्ये प्रवेश परीक्षेतील प्राप्त गुणास ५० टक्के भारांश आणि दहावी परीक्षेतील प्राप्त गुणास ५० टक्के भारांश देण्यात येणार आहे. गुणानुक्रमे अंतिम गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी नाशिक कार्यालयाच्या स्तरावरून प्रसिद्ध केल्या जाणार आहे.