अमरावती/ संदीप मानकर
पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम विदर्भातील ५११ सिंचन प्रकल्पांत ४८.२८ टक्के पाणीसाठा साचला आहे. सहा विविध प्रकल्पांची २२ गेट उघडण्यात आले असून, त्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने अनेक नद्या दुथडी वाहत आहेत.
विशेषत: पश्चिम विदर्भातील २५ मध्यम प्रकल्पांत २३ जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, ५५.२३ टक्के पाणीसाठा साचला आहे. नऊ मोठ्या प्रकल्पात सरासरी ५१.७२ टक्के पाणीसाठा साचला आहे. ४७७ लघु प्रकल्पात मात्र ३९.६६ टक्के पाणीसाठा आहे. ५११ प्रकल्पाची संकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा हा १५८५.१७ दलघमी आहे. त्याची सरासरी टक्केवारी ही ४८.२८ टक्के ऐवढी आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता असून, २३ जुलैे रोजी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत काटोल, रामटेक, भंडारा, गोंदिया येथे मध्यम ते भारी पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
बॉक्स
नऊ मोठ्या प्रकल्पांची स्थती
अमरावती शहराला पाणीपुरवठा करणारा उर्ध्व वर्धा प्रकल्पात ४९.३९ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यतील पूस प्रकल्पात सर्वाधिक ९६.७५ टक्के, अरुणावती ६२.८५ टक्के, बेंबळा ६६.८९ टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ५७.४५ टक्के, वान ३७.१३ टक्के, बुलडाणा जिल्ह्यतील नळगंगा प्रकल्पात २८.४५ टक्के, पेनटाकळी ३२.५० टक्के, खडकपूर्णा ८.७३ टक्के पाणीसाठा आहे.
बॉक्स
सहा प्रकल्पांची २२ दारे उघडली
दोन दिवसाच्या दमदार पावसामुळे २३ जुुुलैपर्यंत अपेक्षित पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे सहा प्रकल्पाचे २२ दरवाजे उघडण्यात आली आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा या मोठ्या प्रकल्पाचे दोन गेट १० सेंमीने उघडण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील शहानूर यामध्यम प्रकल्पाचे चार गेट १० सेंमीने, पूर्णा मध्यम प्रकल्पाचे सर्वाधिक ९ गेट १० सेमीने, सपन मध्यम प्रकल्पाचे चार गेट २० सेंमीने, यवतमाळ जिल्ह्यातील अडाण मध्यम प्रकल्पाचे पाच गेट पाच सेंमीने, तर बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी प्रकल्पाचे १० सेंमी गेट उघडण्यात आले आहे.