अमरावती: पावसाची तूट राहिल्याने भूजलाचे पुनर्भरण झालेले नाही. त्यामुळे १३ तालुक्यांच्या भूजल पातळीत तूट आलेली आहे. जलस्रोत, उद्भव आतापासूनच कोरडे पडू लागले आहे, त्यामुळे मार्चअखेर किमान ४८३ गावांना कोरड लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने ५०८ उपाययोजनांची मात्रा योजली आहे. यावर किमान १२.७१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.
यंदा मान्सूनला तीन आठवड्यांचा विलंब झाला. त्यानंतरही ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवस पावसाचा खंड राहिला. त्यामुळे जिल्ह्यात चांदूरबाजार वगळता उर्वरित १३ तालुक्यांत ३१ टक्के पावसाची तूट राहिली. अशा परिस्थितीत जानेवारी अखेरपासून जलस्रोत कोरडे पडायले लागले आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या स्मरणपत्रानंतर जरा उशिरानेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केलेला आहे.
जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत राहणाऱ्या पाणीटंचाईच्या दुसऱ्या टप्प्यात ४८३ गावांना पाणीटंचाईची झळ लागण्याची शक्यता आहे. शिवाय मेळघाटात उंचावरील काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. आता रब्बी हंगामासाठी भूजलाचा अमर्याद उपसा होत आहे. याचाही परिणाम होऊन नजीकचे जलस्रोताच्या पातळीत कमी येणार आहे.