पोलिसांचा चोख बंदोबस्त : ३१ सार्वजनिक मंडळे संवेदनशील अमरावती : अश्विन शुद्ध प्रतिपदा १ आक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला विधीवत पूजा करून सुरुवात झाली. आता दहा दिवस भाविकांचा उत्साहाला उधाण येणार आहे. यंदा शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत ४८६ दुर्गा व ७४ शारदा देवींची स्थापन होणार आहे. यादरम्यान शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. शहरातील ३१ संवेदनशील सार्वजनिक मंडळांकडे पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात शहरातील वातावरण भक्तीमय होते. नऊ दिवस शहर रोषनाईने लखलखून जाते. अंबा व एकविरा देवीच्या दर्शनासाठी लक्षावधी भाविक येतात. त्यामुळे दिवसरात्र शहरातील बाजारपेठ सजली असते. यंदा ४८६ दुर्गा मंडळांच्या नोंदी पोलीस विभागाकडे असून भव्य मिरवणूक काढून दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली आहे. बाजारपेठेत फुले, साज श्रृंगार, खाद्यपदार्थांसह विविध वस्तु विक्रीसाठी व्यापाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. या उत्सवादरम्यान काही अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशाने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याकरिता ४ सहायक पोलीस आयुक्त, २० पोलीस निरीक्षक, ९० सहायक पोलीस निरीक्षक व पीएसआय, २३० पोलीस कर्मचारी, ११९ महिला पोलीस, ३५० होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, ४०० पोलीस मित्र, यांसह १ कंपनी असा तडगा बंदोबस्त लावण्यात आला आहे. (प्रतिनिधी)संवेदनशील चौकांवर लक्षनवरात्रौत्सव साजरा करताना शहरातील काही ठिकाणी अप्रीय घटना घडल्या आहेत. अशा ३१ संवेदनशील चौकांकडे यंदा पोलीस विशेष लक्ष ठेवून राहणार आहेत. त्या चौकांमध्ये पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात येणार आहे. ध्वनीप्रदूषणावर होणार कारवाईदरवर्षी शहरात नवरात्रौत्सवाची धूम पाहायला मिळते. या उत्सवादरम्यान ढोल ताश्यासह डिजेच्या माध्यमातून उत्साह दाखविला जाते. यादरम्यान ध्वनीप्रदूषण अधिनियमांचे उल्लंघन झाल्यास पोलीस कारवाई करणार आहे. त्याकरिता पोलीस विभागाकडून विविध ठिकाणी पाच पथके तयार करण्यात आली असून ते ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करणार आहेत.
४८६ दुर्गा, ७४ शारदा देवींची स्थापना
By admin | Published: October 02, 2016 12:15 AM