अमरावती : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खाजगी शाळातील २५ टक्के राखीव जागांवरील मोफत प्रवेशाकडे निवड यादीतील ४८६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून, १० ऑगस्टपासून त्यांना संधी देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात २४४ शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली होती. या शाळेतील २०७६ जाण्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात असून ५९१८ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी १९८० विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे. ११ जूनपासून या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सुरुवातीला ही प्रक्रिया संथगतीने सुरू होती. दुसरीकडे शाळा उघडून दोन महिने संपायला आले. शाळांमध्ये अध्यापन प्रक्रिया सुरू असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाढीव मुदत देऊनही प्रवेश निश्चित होत नसतील, तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश का दिले जाऊ नये, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
बॉक्स
प्रतीक्षा संपली
आरटीई प्रवेश प्रक्रिया संथगतीने सुरू असल्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी किती कधी मिळणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होता.
ऑनलाइन शाळा सुरू झाल्या आहेत. पाल्यांची शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही चिंता पालकांना सतावत होती. मात्र, आता प्रतीक्षा यादीतील प्रतीक्षा संपली आहे. पालकांना संकेतस्थळ पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बॉक्स
आरटीई अंतर्गत जिल्हा शाळांची नोंदणी २४४
एकूण जागा २०७६
आतापर्यंत झालेले प्रवेश १४६९
एकूण शिल्लक जागा ४८६
कोट
आरटीई प्रवेश प्रक्रिया ११ जूनपासून सुरू झाली होती. यासाठी वेळोवेळी मुदतवाढ दिली. यात १४६९ विद्यार्थ्याचे प्रवेश निश्चत झाले आहेत. आता उर्वरित ४८६ जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे.
- एजाज खान, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)