जितेंद्र दखने
अमरावती : जिल्हा परिषदेच्यावतीने पूृरस्थितीमुळे ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील २२ गावांची स्थिती पावसाळ्यात अतिसंवेदनशील होत असून, इतरांशी यापैकी काही गावांचा संपर्क तुटतो. त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना दरवर्षी फटका बसत असतो. यावर्षीदेखील पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे भाकीत वर्तविले जात आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्यावतीने यावर्षीचा म्हणजेच २०२१-२२ चा आपत्कालीन कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यात ४८६ गावांना पुराचा फटका बसत असला तरी २२ गावे अतिसंवेदनशील आहेत. या गावांना दरवर्षी पुराचा फटका बसतो. यातील काही गावांना पुराचा वेढा पडतो. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यांच्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन केले आहे. येथील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावर १, तालुका स्तरावर १४ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ५९ पथके स्थापन करण्यात आली आहेत.
बॉक्स
पूरस्थितीची तयारी
पूरबाधित अतिसंवेदनशील २२ गावांमध्ये निवारा, सॅनिटायझर, मास्क व औषध, किट पुरविण्यात येणार आहे. पाणी स्वच्छतेसाठी मेडिक्लोर, क्लोरिनद्वारे पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येईल. पूरबाधित गावांच्या संबंधित आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिकेची सोय तसेच २६ फॉगिंग मशीन उपलब्ध केल्या जाणार आहेत.
बॉक्स
साथरोग नियंत्रण कक्ष
आगामी पावसाचे दिवस लक्षात घेता, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर आणि तालुकास्तावर कक्ष स्थापन हाेणार आहे. ७ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत नियंत्रण कक्षात आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्ती केली जाणार आहे.
बॉक्स
अतिसंवेदनशील गावे
धारणी तालुक्यातील-तांगडा, चोपन, कावळाझिरी, किन्हाखेडा, कुट, धोकडा, सोनाबर्डी, डोलार, परसोली, पळकुंडी, चिखलदरा तालुक्यातील डोमी, कुही, रुईपठार, कुटीदा, सुमिता, कारंजखेडा, मारिता, राक्षा, अढाव, रेहट्याखेडा, बिच्छुखेडा, माडीझडप
बॉक़्स
नदीकाठच्या गावांची तालुकानिहाय संख्या
अमरावती ६३, भातकुली ३५, नांदगाव खंडेश्वर २४, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ५८, अचलपूर ५५, चांदूर बाजार २६, चांदूर बाजार ६, धामणगाव रेल्वे २७, तिवसा ४८, मोर्शी ३८, वरूड ५१, धारणी ७ आणि चिखलदरा तालुक्यातील सर्व गावे डोंगराळ भागातील असल्यामुळे पूरबाधित गावांची संख्या निरंक आहे.