अमरावती : राज्य शासनाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला इंक्यूबेशन केंद्राला मान्यता मिळाली असून, त्याकरिता ५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. परिणामी पश्चिम विदर्भातील शैक्षणिक क्षेत्राला नव्याने उभारी मिळणार आहे.मुंबई येथील राज भवनात स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया कार्यक्रमामध्ये विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव, केंद्रीय वाणिज्य व औद्योगिक मंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डी.टी. इंगोले यांना ‘लेटर आॅफ इंटेन्ट’ प्रदान करण्यात आले. यावेळी इंक्यूबेशन केंद्राचे सदस्य सचिव आशिष गुप्ता व इतर मान्यवर उपस्थित होते.विद्यापीठात इंक्यूबेशन केंद्र सुरू करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव अमरावती विद्यापीठाने राज्य शासनाकडे सादर केला होता. यासंदर्भात कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनात त्याचे यशस्वी सादरीकरण करण्यात आले. उत्कृष्ट सादरीकरणामुळे व पश्चिम विदर्भातील शैक्षणिक आवश्यकता लक्षात घेता विद्यापीठाला हे केंद्र मंजूर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘स्टार्ट अप इंडिया’ महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. राज्य शासनाद्वारे गावोगावी उद्योगाला चालना मिळावी आणि उद्योजक घडावे, हा महत्तम उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये इंक्यूबेशन केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठातील शैक्षणिक विभागात तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकांना आणि नवउद्योजकांना सर्वतोपरी सहाय्य प्राप्त होणार आहे. नवउद्योजक प्रायोजिक तत्वावर आपले उत्पादन या केंद्राच्या सहाय्याने उत्पादित करू शकतील. स्वतंत्र उद्योग उभारणी आणि उत्पादन करण्यासाठी विविध प्रकारच्या मान्यतेपासून ते वस्तू बाजारात विकण्यापर्यंत सर्व सहाय्य या केंद्रामार्फत प्राप्त होईल. विद्यापीठाला इंक्यूबेशन केंद्राला ५ कोटी रुपये शासनाने मंजूर केल्याबद्दल कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आणि कुलसचिव अजय देशमुख यांनी शासनाचे आभार मानले आहे.
राज्य शासनाने इंक्यूबेशन केंद्रासाठी ५ कोटी रुपये मंजूर केले आहे. ही बाब पश्र्चिम विदर्भातील शैक्षणिक क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. येत्या काळात या केंद्र्राच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात बरेच बदल होतील.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगे बाबा विद्यापीठ, अमरावती