अमरावती - शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नागपूरला परतणाऱ्या एका कुटुंबाच्या चारचाकी वाहनाला माना (जि. अकोला) ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले. पाचही जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतुल अशोक इंदुरकर (४७), सुनील शिरपूरकर (६०), सुचित्रा सुनील शिरपूरकर (५५), रामकृष्ण संतोष वाघ (६५) व सुनंदा रामकृष्ण वाघ (४५, सर्व रा. नागपूर) अशी जखमींची नावे आहेत. अतुल इंदुरकर हे मर्चंट नेव्हीत कॅप्टन असून, फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडियाचे सचिव आहेत. एकमेकांचे नातेवाईक असलेले नागपूर येथील हे कुटुंबीय मंगळवारी चारचाकी वाहन (एमएच ३१ डीव्ही ५१०४) ने शेगावी दर्शनासाठी गेले होते. बुधवारी सकाळी ते नागपूरकडे परत निघाले. माना फाट्यावर विरुद्ध दिशेने येणा-या भरधाव चारचाकी (सीजी ०४ एच वाय ५८५०) ने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर हे चारचाकी वाहन उलटले.अपघातानंतर माना येथील नागरिक जखमींच्या मदतीसाठी धावून गेले. तेथील गुड्डू रमेश पाटील (२९) यांनी तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कॉल केला. काही वेळात रुग्णवाहिका दाखल झाली. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेत टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. इर्विन चौकीतील पोलीस कर्मचारी मिलिंद गवई यांनी जखमींचे बयाण नोंदविले. या अपघाताचा पुढील तपास माना पोलीस करीत आहेत. अतुल इंदुरकर राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित जखमी अतुल इंदुरकर हे मर्चन्ट नेव्हीत कॅप्टन पदावर आहेत. याशिवाय त्यांना भारतीय शास्त्रीय संगीतात १९९० मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची पत्नीसुद्धा उच्चपदस्थ असल्याची माहिती मिळाली आहे.
शेगावहून परतताना चारचाकीला अपघात, पाच जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 9:12 PM