लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मूळचे सफाई कामगार असलेल्या मात्र प्रभागात बीटप्यून म्हणून सुपरवायझरशिप करणाऱ्या सुमारे ५० जणांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहेत. त्यातील ४४ सफाई कामगार हे स्वच्छता विभागांतर्गत २२ प्रभागात, तर उर्वरित एकेक कामगार हा सामान्य प्रशासन, शिक्षण विभागासह झोन क्रमांक ३ व ४ येथे कार्यरत आहेत, तर एक कामगाराकडे स्वास्थ्य निरीक्षकपद देण्यात आले आहे.
मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी १८ जुलै रोजी तशा सूचना वजा आदेश दिले. त्यामुळे त्या ५० पेक्षा अधिक प्रभारी बीटप्यून व स्वास्थ्य निरीक्षकाला आता सफाई कामगार म्हणून मूळ कामावर परतावे लागणार आहे, तर स्थायी व कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षकांनादेखील सुधारा, अन्यथा प्रशासकीय कारवाईची तंबी देण्यात आली आहे. कार्यभार घेताच मडावी यांनी शहर स्वच्छतेवर कटाक्ष रोखला असून, 'ऑन द स्पॉट' जाण्यासह गुरुवारी दुपारी व सायंकाळनंतर एक अशा एकाच दिवशी दोन बैठकी घेऊन त्यांनी कंत्राटदारांसह एकूणच स्वच्छता विभागातील अधिकारी कर्मचारी व स्वास्थ्य निरीक्षकांच्या कानपिचक्या घेतल्या.
संबंधित झोनचे सहायक आयुक्त व उपअभियंत्यांकडे देखील स्वच्छतेची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाहणी करतेवेळी त्यांना स्वास्थ्य निरीक्षकांकडे प्रत्येकी दोन बीटप्यून असल्याचे लक्षात आले. त्यावर त्यांनी स्वास्थ्य निरीक्षकांना बीटप्यूनच्या कार्यकक्षेची विचारणा केली. आधीच सफाई कामगार कमी आहेत, त्यातील ५० लोक जर बीटप्यून वा लिपिक म्हणून काम करत असतील, तर तुम्ही काय करता, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर ते निरुत्तर झाले. त्यामुळे मडावी यांनी त्या सर्व बीटप्यूनला तातडीने कार्यमुक्त करून त्यांना आपल्या मूळ कामावर परतण्याचे आदेश दिले.
तर प्रशासकीय कारवाई१०० टक्के दैनंदिन वर्गीकृत कचरा संकलन, व्यावसायिक, खाजगी क्षेत्रात रात्रकालीन साफ सफाई, कचरा दिसणाऱ्या ठिकाणाचे सौंदर्गीकरण, शेणखत उचल, नाल्यांची नियमित सफाई, प्लास्टिक बंदी मोहीम, बांधकाम व विध्वंसक कचरा उचलण्यासह दंडात्मक कारवाई करणे महत्त्वाचे असल्याचे सांगून संबंधितांनी विहित वेळेत कार्यवाही करून याबाबतचा अहवाल वेळोवेळी सादर करावा. हयगय आढळल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्याची तंबी उपायुक्त मडावी यांनी दिली आहे.
रस्त्यावर फांद्या दिसू नयेतरस्त्यावर झाडांच्या फांद्या आढळून आल्यास उद्यान व स्वच्छता विभाग यांनी समन्वय साधून कार्यवाही करावी. घंटागाडी नियमितपणे घरोघरी पाठवावी. नाली सफाई करावी. सर्व स्वास्थ निरीक्षकांचे संपर्क क्रमांक प्रसिद्ध करावे. हॉकर्सला डस्टबिन ठेवणे अनिवार्य असून न ठेवल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. यावेळी संबंधित अधिकारी व उपअभियंतांना समन्वय साधून कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.