लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवि राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला. त्यामुळे या दोन्ही आमदारांतील हा वाद आता चांगलाच पेटला आहे. आमदार राणा यांच्याविरुद्ध ५० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात २९ ऑक्टोबर रोजी नोटीस देणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. गुवाहाटीला जाऊन जर मी पैसे घेतले असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ते सिद्ध करावे, असा आक्रमक पवित्रा आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे. १ नोव्हेंबरपर्यंत आमदार रवी राणा यांनी पैसे घेतल्याचे पुरावे सिद्ध करावे, या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे ते म्हणाले. अमरावती येथील महापालिका टाऊन हॉल येथे १ नाेव्हेबर रोजी राज्यभरातून प्रहारचे हजारो कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करतील, अशीही माहिती बच्चू कडू यांनी दिली.
आईलासमोर करून घाणेरडे राजकारण खोके घेतल्याच्या आरोपावरून आमदार रवि राणा आणि बच्चू कडू यांच्यात वाद सुरू आहे, तर राजापेठ पोलीस ठाण्यात महिलांनी बच्चू कडूंविरोधात तक्रार दिली आहे. यात रवि राणा यांच्या आईवर अपशब्द वापरल्याचा आरोप कडू यांच्यावर आहे. याविषयी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले, मी आमदार रवि राणांच्या आईवर बोललो नाही, रवी राणांनी हे घाणेरडे राजकारण करू नये. रवि राणा आईला समोर करून स्वतः पडद्याआड आहेत. स्वतःला लपण्यासाठी आईला समोर करत असल्याचा आरोपदेखील यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.
खोके घेतले की नाही, हे अगोदर स्वत:च आमदार बच्चू कडू यांनी ईडी किंवा सीबीआयमार्फत चौकशी करून घ्यावी. तेव्हा सत्य बाहेर येईल. लोकशाहीत कोणाला कोणावरही दावा ठोकता येतो. नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर दिले जाईल. आईसंदर्भात राजापेठ पोलिसात कोणी तक्रार दिली, याची माहिती नाही. - रवि राणा, आमदार, बडनेरा