लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : बनोसा स्थित राजदीप ज्वेलर्समधून ४० ते ५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास लंपास करण्यात आली. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरटा सीसीटीव्हीत कैद झाल्याने प्रकरणाचा लवकरच उलगडा होण्याचे संकेत पोलिसांनी दिले. ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. राजदीप ज्वेलर्सचे संचालक दीपक प्रांजळे हे गुरुवारी सकाळी १०.२० च्या सुमारास दुकानात आले. त्यांनी दुकानाची स्वच्छता केली. ती आटोपल्यानंतर झाडू कपाटाच्या मागे ठेवण्याकरिता गेले असता एका तरुणाने त्यांच्या दुकानात कपाटाजवळ ठेवलेली सोन्याची दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढला. त्यांनी लगोलग दुकानाच्या बाहेर येऊन शोध घेतला व पोलिसांना घटनेची माहिती दिली. ज्वेलरी शॉपमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने पोलिसांनी रस्त्यालगत असलेल्या अन्य दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात क्रीम कलरचा शर्ट घातलेला, पायात काळ्या रंगाचे बूट असलेला अंदाजे २० वर्षे वयाचा मुलगा विश्वकर्मा ज्वेलर्सकडे पळत जाताना दिसत असल्याचे लक्षात आले. विश्वकर्मा ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, तो मुलगा त्या ठिकाणाहून दुचाकीवर दोन व्यक्तींसोबत जाताना दिसत आहे. दर्यापूर पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून पुढील तपाससासाठी स्थानिक गुन्हे शाखेला पाचारण केले. पुढील तपास अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक अजय आकरे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांचे पथक करीत आहेत.
गुरुवारी सकाळी १०.२५ दरम्यान दुकान उघडल्यानंतर सफाई करीत असताना सोन्याची बॅग दुकानातील कपाटाजवळ ठेवली होती. कपाटामागे फडा ठेवण्याकरिता गेलो तोच चोराने बॅग लंपास केली. बॅगमध्ये एक किलोच्या जवळपास सोन्याचे दागिने होते. - दीपक प्रांजळे, संचालक, राजदीप ज्वेलर्स
सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन यापूर्वीच सराफा दुकानदारांना केले होते. सदर घटनेचा तपास वेगवेगळ्या दिशेने सुरू आहे. लवकरच चोराला गजाआड केले जाईल. - तपन कोल्हे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती