लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या केंद्र शासनाच्या योजनांतर्गत विविध नावीन्यपूर्ण अभिनव उपक्रम राबवून मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या सर्व स्तरावर जनजागृती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत मंगळवारी दिले.‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानामध्ये अमरावती जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. अभियानासाठी सन २०२१-२२ या वर्षासाठी ५० लक्ष रुपयांचा कृती आराखडा या वेळी मंजूर करण्यात आला. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) कैलास घोडके, बालविकास प्रकल्प अधिकारी राजश्री कोलखेडे, श्रीमती एम. पांचाळ, अतुल भडंगे, मीनाक्षी भस्मे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उमेश टेकाळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीषा सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.योजनेच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन तयार करण्यात आले आहे. सर्व विभागांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा. यामध्ये कर्तबगार मुलींच्या पालकांचा सत्कार, पथनाट्य, गर्भलिंगनिदान होणार नाही यासाठी विविध पथके, गर्भलिंग निदान झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई, विविध माध्यमांद्वारे प्रचार -प्रसिद्धी आदी बाबींचा समावेश आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या. महिला व बाल विकास विभाग या उपक्रमासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. शासनाच्या इतर विभागांना या उपक्रमासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वच विभागांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांगीण प्रयत्न करण्याची सूचना जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी यावेळी दिली. कैलास घोडके यांनी उपक्रमांची माहिती दिली.
पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला व स्त्रीभ्रूणहत्यांना प्रतिबंध करणे, मुलींच्या जीविताची व संरक्षणाची जबाबदारी तसेच मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागाची खातरजमा करून त्यांचा सर्वांगीण विकास साधणे आवश्यक आहे. त्यासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान जिल्ह्यात घरोघर पोहोचवावे. - यशोमती ठाकूर, महिला व बाल विकास मंत्री