कारवाईकडे लक्ष : ग्रा. पं. ने झटकली जबाबदारी मनीष कहाते वाढोणा रामनाथयेथील गणेशपूर सिंचन प्रकल्पातील ५० लाख रूपयांच्या चोरीला गेलेल्या मासोळीचा चौकशी अहवाल नुकताच जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आता कारवाई कोणावर होणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.लघुसिंचन विभागाच्या ताब्यात आलेल्या गणेशपूर सिंचन प्रकल्प कार्यकारी अभियंता लघुसिंचन यांनी स्थानिक ग्रा. पं. सोबत करारनामा केला होता आणि १७ हजार रुपये सुद्धा भरणा लघुसिंचन विभागाकडे केला होता. परंतु ग्रामपंचायत म्हणते, आम्ही कोणताही करारनामा केला नाही. १७ हजार रूपये कोणी कधी भरले हेही आम्हाला माहीत नाही. आमच्या स्वाक्षरी करारनाम्यावर आल्या कशा, आम्हाला माहीत नाही. स्वाक्षरी केलीच नसल्याचा घुमजाव ग्रामपंचायत प्रशासनाने केला. त्यामुळे आता कारवाई कोणावर होणार, असा पेच पडला आहे. आमचा मासोळी प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा गुप्त चौकशी अहवाल ग्रामपंचायतने पंचायत समितीला दिला आहे. महिना होऊनही तत्कालिन सरपंच वंदना चौधरी आणि ग्रामविकास अधिकारी के. एन. घोंगडे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच अजून किती दिवस लागणार कारवाईला असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रा. पं. सदस्या निकिता गायधनी यांनी केली.
५० लाखांच्या मासोळी चोरीचा अहवाल सीईओंच्या दालनात
By admin | Published: August 19, 2015 12:47 AM