नरेंद्र जावरे
परतवाडा (अमरावती) : शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली. त्याचा फायदा शहरी नागरिकांना घेता येत असला तरी मेळघाटसह जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात बसफेऱ्या जात नसल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. मेळघाटच्या ३०० पैकी तब्बल २२० पाड्यांत एसटी पोहोचत नसल्याचे गंभीर चित्र आहे. परिणामी, योजनेच्या फायद्यासाठी बस गाड्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात परिवहन मंडळाचे सर्वांत मोठे आगार परतवाडा आहे. मध्य प्रदेशच्या सीमारेषेवर असलेल्या या आगारातून अमरावती, अकोला जिल्हास्तरावर, तर अचलपूर, धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार, अंजनगाव, दर्यापूर, वरूड, मोर्शी येथे दिवसभर फेऱ्या होतात. भंगार बसचे आगार म्हणून आता याची ओळख झाली आहे. शासनाच्या मोफत आणि अर्ध्या सवलतीची तिकीट योजना यामुळे प्रवासी संख्या वाढली आहे. ‘सासू-सासरे मोफत, सुनेला हाफ तिकीट’ अशी स्थिती झाली आहे. तथापि, खासगी वाहनांकडे वळलेला प्रवासी वर्ग एसटीकडे वळला तरी बस गाड्या भंगार आणि अल्प प्रमाणात असल्याचे चित्र आहे.
चार हजार हाफ तिकीट, दोन हजार फुकट
७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा लाभ एकट्या परतवाडा आगारात दररोज दोन हजार नागरिक घेत आहेत. पाच दिवसांपूर्वी महिलांना ५० टक्के तिकिटाचा लाभ चार ते साडेचार हजारांपर्यंत गेला असून, येत्या दिवसांत तो वाढणार आहे.
अमरावती, अकोलासह अनेक फेऱ्या बंद
जिल्ह्यात ग्रामीण भागातील मोठे आगार परतवाडा आहे. अमरावतीसाठी १६ तर अकोल्यासाठी १२ अशा २८ व ग्रामीण भागासह मेळघाटातील अनेक फेऱ्या बस गाड्यांअभावी बंद आहेत. परिणामी, प्रवाशांना खासगी आणि इतर वाहनांचा आश्रय घ्यावा लागत आहे.
पाच लाख उत्पन्न, पंधरा बसगाड्यांची गरज
परतवाडा आगारात १४२ चालक व १२६ वाहक कार्यरत असून, पाच शिवशाही मिळून ५७ बस गाड्या आहेत. २०१९ मध्ये एकूण ७० बस गाड्या होत्या. परिणामी १५ पेक्षा अधिक बस गाड्यांची गरज आहे. त्यातील पाच अमरावती येथे दुरुस्तीसाठी पडून आहेत.
आदिवासी, ग्रामीण भाग आजही वंचितच
मेळघाटात मानव विकास अंतर्गत ११ बस गाड्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील ३०० पेक्षा अधिक पाड्यांपैकी केवळ ८० पाड्यांत धावतात. त्यामुळे हजारो आदिवासींच्या गावात आजही एसटी जात नसल्याचे वास्तव आहे. परतवाडा आगारात पुरेशा बस गाड्याच नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही.
प्रवासी संख्या वाढली आहे. अमरावती - अकोला मार्गावरील फेऱ्या कमी झाल्या आहेत. मेळघाटातील फेऱ्या बंद आहेत. नवीन बसची मागणी आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- जीवन वानखडे, आगर व्यवस्थापक, परतवाडा