अनिल कडू
परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रात १४ दिवसांत ५०० कोरोना संक्रमितांची नोंद झाली आहे. यात अवघ्या पाच दिवसांत १२ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. शनिवारी एकाच दिवशी पाच मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे शासकीय आकडेवारीतून पुढे आले आहे.
अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार घातला आहे. दररोज मृत्यूच्या घटना पुढे येत आहेत. १४ मे रोजी तालुक्यात १४१ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. यात ग्रामीण भागातील ९३, तर शहरी भागातील ४८ रुग्णांच्या समावेश आहे. १५ मे रोजी ग्रामीण भागात ४५, तर शहरी भागात ३१ रुग्ण नोंदविले गेले. आजपर्यंत अचलपूर नगरपालिका क्षेत्रात एकूण १ हजार ७७४ कोरोनाग्रस्त नोंदविले गेले आहेत. मृतांची संख्या ३८ झाली आहे.
सुबोध हायस्कूलचे लिपिक अनिल लिपणे यांचा अमरावती येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी सिटी हायस्कूलचे लिपिक मुकुंद देशपांडे यांचेसुद्धा कोरोनाने उपचारादरम्यान निधन झाले होते.
----सहा गावांनी रोखला कोरोना ------
कोरोनाच्या उद्रेकातही अचलपूर पंचायत समिती अंतर्गत पार्डी, कुंभी वाघोली, काळवीट, गोंड वाघोली, डोलार (पुनर्वसन) आणि पस्तलाई (पुनर्वसन) या सहा गावांनी संसर्गाला वेशीवरच रोखले असल्याची माहिती विस्तार अधिकारी एम.एस. कासदेकर यांनी दिली. वृत्त लिहिस्तोवर या सहा गावांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.
(फोटो: मृतक लिपणे)