लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गतवर्षीच्या कपाशी सोयाबीनला भाव न मिळाल्याने भावांतर योजनेच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार व दोन हेक्टर मर्यादेत अनुदान दिले जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,८४,५४४ शेतकऱ्यांनी कृषी सहायकाकडे ई-केवायसी केली असल्याने त्यांच्या खात्यात पेरणी क्षेत्राच्या अनुषंगाने अर्थसाहाय जमा होत आहे. त्यामुळे सणासुदीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मागच्या हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाने सरासरी उत्पन्नात कमी आली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे शेतमालास हमीभावदेखील मिळाला नाही. त्यामुळे राज्य शासनाने भावांतर योजनेच्या माध्यमातून दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजार देण्याची घोषणा केली होती, त्याची अंमलबजावणी दोन दिवसांपासून सुरू झालेली आहे. गतवर्षी ई-पीक पाहणी केलेल्या ३,५३,६८३ शेतकऱ्यांच्या याद्या जमाबंदी विभागाने कृषी विभागाला पुरविल्या होत्या व यामध्ये नावे असलेल्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सध्या जिल्ह्यात सुरू आहे. शासनाद्वारा २९ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अर्थसाहाय्य जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया ३० पासून सुरू झाली आहे. अद्याप ४६,२४६ शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया केली नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
याद्या प्राप्त शेतकरी : ३,५३,६८३ कपाशीकरिता टार्गेट : १,५२,३४२ सोयाबीनसाठी टार्गेट : २,०१,३४१ आतापर्यंत केवायसी : १,८४,५४४ ई-केवायसी प्रलंबित : ४६.२४६
अर्थसाहाय मिळालेले तालुकानिहाय शेतकरी अचलपूर १०,६५३, अमरावती २२,८६४, अंजनगाव सुर्जी १६,२४६, भातकुली १४,४०५, चांदूर रेल्वे १३,०८१, चांदूर बाजार १४,८१६, चिखलदरा ४,९०१, दर्यापूर १९,८७५, धामणगाव रेल्वे १२,३४४, धारणी ६,६४४, मोर्शी १५,९६६, नांदगाव खंडेश्वर १९,८७२, तिवसा १३,३६५, व वरूड तालुक्यात ९५१२ शेतकऱ्यांना अर्थसाहाय मिळण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.