अमरावती : महापालिका हद्दीत शिकस्त झालेल्या अतिधोकादायक ५१ इमारती आहेत. या इमारती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने किमान २५० नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. पाचही झोनमधील या मालमत्ताधारकांना पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेने नोटीस बजावल्या.
इमारती निष्कासित न केल्यास त्या इमारतींचा वीज व पाणीपुरवठा बंद केला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या बांधकाम विभागाद्वारे झोन क्रमांक १, २ व ५ मधील पाच इमारतींचे धोकादायक बांधकाम पाडण्यात आले आहे. याशिवाय ११ मालमत्ताधारक या नोटीसविरोधात न्यायालयात गेले आहेत. या इमारती आता शासनाच्या ५ नोव्हेंबर २०१५ च्या आदेशान्वये अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करण्याच्या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आल्याचे महापालिकेचे शहर अभियंता रवींद्र पवार यांनी सांगितले.
सी-१ प्रवर्गात मोडणाऱ्या इमारतींना महापालिका अधिनियमाच्या कलम ३५४ (१) अन्वये नोटीस बजावण्यात आल्या आहेत. इमारती रिकाम्या करण्यापूर्वी त्यामधील रहिवाशांना त्यांच्या ताब्यात असलेले चटईक्षेत्र मोजून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इमारती निष्कासित करण्यात अडथळा निर्माण झाल्यास, त्या इमारतींची वीज व पाण्याची जोडणी खंडित करण्यात येणार आहे. याशिवाय उच्च न्यायालयाचे आदेशाप्रमाणे शिकस्त खासगी इमारतींमधील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची जबाबदारी ही पोलीस विभागाची असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
बॉक्स
असा आहे इमारतींचा प्रवर्ग
सी-१ : अतिधोकादायक व राहण्यास अयोग्य. तात्काळ निष्कासित करणे.
सी-२ ए : इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करण्याचा प्रवर्ग.
सी-२ बी : इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरुस्ती करता येणारा प्रवर्ग
सी-३ : इमारतींची किरकोळ दुरुस्ती करता येणारा प्रवर्ग.
कोट
झोन २ व ५ मध्ये धोकादायक इमारतींची संख्या जास्त आहे. अतिधोकादायक ५० इमारतींची अभियंत्यांद्वारे पाहणी करण्यात आली आहे. काहींसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या निवाड्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
- रवींद्र पवार, शहर अभियंता, महापालिका
कोट
इमारत धोकादायक असली तरी दुसरा पर्याय आमच्याकडे नाही. मालक दुरुस्ती करीत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात आम्ही आवश्यक ती डागडुजी करतो. सध्या दुसरे घर शोधणे शक्य होत नाही.
वसंत जुनघरे, भाडेकरू.
बॉक्स
वारंवार नोटीस, आता मालमत्ताधारक जबाबदार
शिकस्त इमारतींसाठी मालमत्ताधारकांना वारंवार व दरवर्षी नोटीस दिली जाते. यंदाही सर्वांना नोटीस दिल्या आहेत. त्यामुळे काही दुर्घटना झाल्यास संबंधित जबाबदार राहतील. काही इमारती महापालिकेने निष्कासित केल्या असल्या तरी काहींनी नोटीसविरोधात न्यायालयात धाव घेतल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले.
बॉक्स
शिकस्त इमारतींची झोननिहाय स्थिती
झोन क्रमांक सी-१ सी-२ (ए) सी-२ (बी) सी-३ एकूण
झोन १ ०१ ०१ ०० ०५ ०७
झोन २ ३८ ३५ १९ ०१ ९३
झोन ३ ०० ०० ०० ०० ००
झोन ४ ०२ ०० ०२ ०३ ०७
झोन ५ १० २० १४ ०४ ४८
एकूण ५१ ५६ ३५ १० ५४