अमरावती : विजयादशमीच्या शुभपर्वावर अंबानगरीत ५१ फुटाच्या दहातोंडी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. २८ वर्षांनंतर शनिवारी झालेल्या रावण दहनाला अमरावतीकरांनी तोबागर्दी केली. विश्व हिंदू महासंघाचे अध्यक्ष तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष महंत मुकेशनाथ व महामंत्री हेमेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्हाध्यक्ष आशीष राठी यांनी रावण दहनाचा कार्यक्रम यशस्वी केला. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रत्यंचा ताणून रावणाच्या दिशेने बाण सोडला आणि क्षणार्धात रावण दहन झाले. यावेळी मंचावर कार्यक्रम अध्यक्ष नितीन धांडे, प्रमुख अतिथी महंत मुकेशनाथजी, हेमेंद्र जोशी, आ. सुनिल देशमुख, नितीन देशपांडे, महापौर संजय नरवणे, महापालिका आयुक्त हेमंत पवार, माजी आमदार जगदीश गुप्ता, शिवसेनेचे सुनिल खराटे, सरिता सोनी, राजु राठी, पदमा खानझोडे, प्रदिप शिगोंरे, सिमेश श्राफ, विनोद लखोटिया, राजाभाऊ खारकर, किशोर जाधव, विशाल कुळकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सुनील अग्रवाल, तर संचालन माधुरी छावसरीया यांनी केले. नियोजनबध्द बंदोबस्त-रावण दहन कार्यक्रमास काही महिला संघटनांनी विरोध दर्शविला होता. कार्यक्रमस्थळी विरोध होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी बंदोबस्ताचे विशेष नियोजन केले होते. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या नेत्तृत्वात ठाणेदार मनीष ठाकरे, अर्जुन ठोसरे, पंजाब वंजारी यांच्यासह पोलिसांनी सुनियोजीत बंदोबस्त लावल्याने अतिशय उत्साहात रावण दहन पार पडले. रावण दहन विरोधी संघर्ष समितीच्या महानंदा टेकाम यांच्यासह २० ते २५ महिलांनी रावण दहनाला विरोध दर्शवून जयस्तंभ चौकाजवळ घोषणाबाजी केली. त्यामुळे शहर कोतवाली पोलिसांनी कार्यक्रम संपेपर्यंत महिलांना ताब्यात घेतले होते.
51 फुटांच्या रावण पुतळ्याचे अंबानगरीत दहन, अमरावतीकरांनी केली तोबागर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 8:33 PM