अमरावती : ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे. पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांनी पावसाची सरासरी ओलांडली आहे. दरम्यान या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे ५१ व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय १९ गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे. या आपत्तीमुळे ६,७८३ गावांतील ५०,८४१ नागरिक बाधित झालेले आहे.
पश्चिम विदर्भात यंदा ५५ पैकी ४२ तालुक्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी सध्या पार केलेली आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या ५९ टक्केच पाऊस झालेला आहे. त्यातुलनेत उर्वरित १२ तालुक्यात पावसाची स्थिती समाधानकारक आहे. ऑगस्ट महिन्यापासून पावसाने चांगलाच जोर पकडलेला आहे. या कालावधीत चार ते पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे १५,२२२ हेक्टर शेती खरडून गेली व या आपत्तीमुळे २,२२,४१० हेक्टरमधील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्त पीयूषसिंह यांनी शासनाला पाठविलेला आहे.
या अपत्तीमुळे १३ सार्वजनिक मालमत्तांचे ८९.१८ कोटींचे नुकसान झालेले आहे. याशिवाय ४८६ घरांची पूर्णत: व ७,९५३ घरांची व ७,३१६ कच्चा घरांची अंशत: पडझड झालेली आहे. याआपत्तीत ६७ गोठेदेखील जमीनदोस्त झालेले आहे. या नागरिकांना अद्याप अनुदान देण्यात आलेले नाही.
बॉक्स
वीज पडून २०, पुरात वाहून २१ जणांचा मृत्यू
* या आपत्तीत सर्वाधिक २१ जणांचा पुरात वाहून गेल्याने व २० जणांचा वीज पडून मृत्यू झालेला आहे. भिंत अंगावर कोसळून चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १.६८ कोटींची मदत मृतांच्या वारसांना देण्यात आलेली आहे.
* या आपत्तीत १४१ मोठी दुधाळ जनावरे व ५९४ लहान दुधाळ जनावरांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय ओढकाम करणाऱ्या ६० जनावरांचा व २० लहान जनावरांचा मृत्यू झालेला आहे. शासनाद्वारा अद्याप पशुपालकांना मदत मिळालेली नाही.